संकटात मोठा अधार, नगराध्यक्षांचे मानले आभार

भूषण आरोसकर
Friday, 31 July 2020

एकीकडे अतिक्रमण हटवित असताना पुन्हा पुनर्वसन केले. त्यामुळे त्या सातही जणांनी नगराध्यक्ष परब यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण केलेले स्टॉल हटविल्यानंतर येथील सात स्टॉलधारकांना नगराध्यक्ष संजू परब यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन केले. या सर्वांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन आभार मानले. 

येथील पालिकेने येथील भाजी मंडई परिसरात अनधिकृतरित्या स्टॉल उभारून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत केलेले अतिक्रमण हटविले होते. एकूणच त्या निर्णयाविरोधात नगराध्यक्षांवर टीकेची झोड उठली आहे. काहींकडून नगराध्यक्ष परब यांनी केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे तर काहींकडून ऐन सणासुदीच्या दिवसात व्यापाऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याप्रकरणी टीका तसेच नाराजी व्यक्त होत आहे; मात्र दुसऱ्या बाजूने विचार करता स्वच्छ आणि सुंदर सावंतवाडी बनवण्याच्या हेतूने भाजी मार्केटने मोकळा श्‍वास घेतला. 

वाचा - रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात एक कर्मचारी सांभाळतोया चार वॉर्ड

पालिकेने अतिक्रमण हटवण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर काहींनी स्वतःहून दुकाने बाजूला केली होती; मात्र रोजीरोटी गेल्याचे दुःखही त्यांच्या मनात होते. अशातच भाजी मंडईमध्ये प्रवेश करताना ज्या सात स्टॉल धारकांची अतिक्रमणे हटवली होती त्यात सातजणांना नगराध्यक्षांनी शहरात अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन केले. एकीकडे अतिक्रमण हटवित असताना पुन्हा पुनर्वसन केले. त्यामुळे त्या सातही जणांनी नगराध्यक्ष परब यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, भाजपचे शहर मंडळ उपाध्यक्ष अजय गोंधावळे, केतन आजगावकर, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते. तसेच दत्तात्रय कळणेकर, संतोष कळणेकर, चंद्रकांत गावडे, सहदेव ठाकूर, रवी वाडकर, शशिकांत पार्सेकर, रमेश वेतोरकर, गुरु पार्सेकर, जॉनी अल्मेडा आदी व्यापारी उपस्थित होते.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The merchants met the mayor sawantwadi sindhudurg