esakal | रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात एक कर्मचारी सांभाळतोया चार वॉर्ड
sakal

बोलून बातमी शोधा

vacancies in ratnagiri district hospital

कोविड रुग्णालयात गेल्या चार महिन्यात अनेक वॉर्ड सुरू झाले. रुग्णालयाबाहेरही रुग्णालयाचे दोन भाग चालू करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात एक कर्मचारी सांभाळतोया चार वॉर्ड

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरू झाल्यापासून सर्व रुग्णालयीन कर्मचारी रात्रंदिवस राबत आहेत. पण त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला कोणालाच वेळ नाही. एक कर्मचारी, चार वॉर्ड म्हणजे 100 रुग्ण सांभाळत आहे. त्यामुळे त्वरित वर्ग 4 मधील रिक्त पदे भरण्यात यावीत, अन्यथा 10 ऑगस्टला आंदोलन करू, असा इशारा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनाद्वारे दिला आहे.


कोविड 19 मुळे अ‍ॅडमिट व्हायचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच तुटपुंज्या कर्मचार्‍यांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. गेली अनेक वर्षे कर्मचार्‍यांना फक्त आश्‍वासने दिली जातात. ही आश्‍वासने पूर्ण होण्याच्या आशेवर कित्येक कर्मचारी निवृत्त झाले, काही मरण पावले. त्यांच्या रिक्त जागीसुद्धा कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. उलट आहेत त्याच कर्मचार्‍यांना राबवून काम केली जात आहेत, अशी खंत या निवेदनात लिहिली आहे.


कोविड रुग्णालयात गेल्या चार महिन्यात अनेक वॉर्ड सुरू झाले. रुग्णालयाबाहेरही रुग्णालयाचे दोन भाग चालू करण्यात आले. पण कर्मचारी तेच आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या तुटपुंज्या कर्मचार्‍यांची मानसिकता बदलत असून ते दडपणाखालीच काम करत आहेत. त्यांचे मानसिक खच्चीकरणही होत आहे, संतुलनही बिघडत आहे. त्यामुळे त्वरित वर्ग 4 कर्मचारी रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.

हे पण वाचा कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांना अटक होण्याची शक्यता.... 

या निवेदनाचा विचार झाला नाही तर येत्या 10 ऑगस्टला सर्व वर्ग 4 कर्मचारी आंदोलन करतील व याची जबाबदारी प्रशासनावरच राहील. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वासुदेव वाघे, उपाध्यक्ष दिनकर कांबळे, सरचिटणीस विजय जाधव, कोषाध्यक्ष चंद्रशेखर सागवेकर यांनी हे निवेदन दिले आहे.

स्वच्छतेचा उडाला बोजवारा

अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे वॉर्डमध्ये साधा कचरासुद्धा काढला जात नाही, स्वच्छतेच्या नावाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या रोषालाही कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागत आहे. आता कर्मचारीच आजारी पडू लागले आहेत.


संपादन - धनाजी सुर्वे