वारंवार येणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांची फरफट

 राधेश लिंगायत
Thursday, 24 September 2020

गेल्या दीड महिन्यापासून वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे

हर्णे - पुन्हा एकदा २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत वादळामूळे सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ(रत्नागिरी), दिघी(रायगड) खाडीत आसरा घेतला. गेल्या दीड महिन्यापासून वारंवार येणाऱ्या वादळांमुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमार हताश होऊन बसला आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती आमची झाली आहे, अशी व्यथा येथील मच्छीमार व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा हवामान खात्याकडून संदेश मिळाल्यामुळे मच्छिमारांनी घाबरून मासेमारीला ब्रेक लावला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे २०० ते २५० नौका फक्त मासेमासाठी समुद्रात उतरल्या आहेत. उर्वरित ४०० ते ५०० नौका अजून शाकरलेल्या अवस्थेतच आहेत. वादळामुळे हे मच्छिमार नौका मासेमारीसाठी बाहेर काढण्यास धजत नाहीत.  

गेल्या दीड महिन्यापासून वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी मासेमारीचा हंगाम पाहिजे तसा मिळालाच नाही.  कोरोनाच्या महामारीमध्ये लोकडाऊनची मुदत जशी वाढत होती याप्रमाणे वादळं येत आहेत. कारण १ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या हंगामानंतर वादळच येत आहेत. एक वादळ गेले की लेगेच परत हवामान खात्याचा संदेश येतो. या दीड महिन्यात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार वादळांचा तडाखा मच्छिमारांना बसत आहे. त्यातच ज्या खाडीमध्ये सुरक्षिततेसाठी नौका नेली असेल त्याठिकाणी तेथील कमिटी किंवा मच्छिमार त्यांच्या बंदरात मारून आणलेल्या मासळीचा बाजार करू देत नाहीत. त्यामुळे भरमसाठ भाडं भरून ज्या खाडीत नौका असतील तेथून मच्छी वाहतूक करणाऱ्या गाडी मधून ती पुन्हा बाजारासाठी हर्णे बंदरात आणावी लागते. तसेच जर वातावरण थंड झालं आणि आता मासेमारीसाठी जायचे असेल तर लागणारे डिझेल हे देखील हर्णे बंदरातूनच वाहतूक करावे लागते. ते ही मोठं खर्चिक ठरत. कारण हर्णे बंदरातील  नौकांचा डिझेल कोटा येथील सोसायट्यांमधूनच मिळालेला असतो. १ ऑगस्टलाच मासेमारीसाठी बाहेर पडलेल्या नौका अजूनही हर्णे बंदरात दाखल  झाल्याच नाहीत. 

हे पण वाचाचिपळूकरांनो रेमडेसिवीर इंजेक्शन हवे आहे, येथे साधा संपर्क 

माझी वैयक्तिक नौका गेल्या पावणेदोन महिन्यात एकदाच हर्णे बंदरात येऊन गेली आहे. कधी दाभोळ, कधी जयगड, कधी दिघी, तर कधी आंजर्ले खाडीत आसरा घ्यावा लागला. परंतु आंजर्ले खाडीत नौका आणताना जर भरती असेल तरच आतमध्ये नौका आणू शकतो अन्यथा खूप तारेवरची कसरत करावी लागते आणि यामध्ये नौकेला जलसमाधी मिळण्याची शक्यता देखील असते. गेले दीड महिना फक्त हर्णे बंदरातील मच्छीमारांची प्रचंड फरफट उडाली आहे. वादळसदृश्य परिस्थिती येणार म्हणून हर्णे बंदरातील २५ नौका दाभोळ, २० नौकांनी जयगड, तर २० ते २५ नौका दिघी खाडीत तर उर्वरित सुमारे १५० नौकांनी आंजर्ले खाडीचा आसरा घेतला; असे येथील मच्छिमार अंकुश दोरकुळकर यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meteorological Department alert