त्सुनामी येणार असा संदेश आला अन् एकच धावपळ उडाली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

20 ऑक्‍टोबर रोजी त्सुनामी येणार, असा पोलिस खात्याच्या वरिष्ठ खात्याकडून संदेश मिळाला आणि दापोली तालुक्‍याचे पोलिस प्रशासन एकदम खडबडून जागे झाले. सर्व साहित्यांसाहित पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला.

हर्णै ( रत्नागिरी) - त्सुनामी येणार असा पोलिस खात्याच्या वरिष्ठ कार्यालयाकडून संदेश प्राप्त झाला आणि पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. तत्काळ यंत्रणा हलली. हर्णै बंदर किनाऱ्याजवळील वस्तीतील ग्रामस्थांना त्सुनामीची कल्पना दिली आणि या सर्व धोकादायक वस्तीतील ग्रामस्थांना हलवायला सुरवात केली. फत्तेगडावरील सर्व ग्रामस्थांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी हलवले. ग्रामस्थ घाबरले; मात्र काही कालानंतर हा मॉक ड्रीलचा प्रकार असल्याचे उघड झाल्यावर लोकांनी निःश्वास टाकला. पोलिस खात्याची रंगीत तालीम व्यवस्थितरित्या पार पडली. 

20 ऑक्‍टोबर रोजी त्सुनामी येणार, असा पोलिस खात्याच्या वरिष्ठ खात्याकडून संदेश मिळाला आणि दापोली तालुक्‍याचे पोलिस प्रशासन एकदम खडबडून जागे झाले. सर्व साहित्यांसाहित पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्सुनामी येणार म्हणून सायरन वाजवत आणि लोकांना ध्वनिक्षेपकाद्वारे त्सुनामीची कल्पना देत पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि वेगाने हर्णै बंदर किनाऱ्याजवळील वस्तीतील ग्रामस्थांना त्सुनामीची कल्पना दिली.

या सर्व धोकादायक वस्तीतील ग्रामस्थांना हलवायला सुरवात केली. फत्तेगडावरील सर्व ग्रामस्थांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी हलवले. अपंग व्यक्तींना व्हील चेअरवर बसवून सुरक्षित ठिकाणी हलवले. मोठमोठ्या लाटांचा मारा होणार असल्याने संपूर्ण वस्ती खाली केली आणि घरदारे पूर्ण बंद करून घेतली. जूनमध्ये झालेले "निसर्ग' वादळ येण्यापूर्वी देखील पोलिस कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे फत्तेगडावरील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. आता लगेच त्सुनामी येणार म्हणून ग्रामस्थ थोडे घाबरून गेले होते. परंतु त्सुनामी येण्यापूर्वी करण्यात आलेली कार्यवाही आणि त्सुनामी येऊन गेल्यानंतर करायची कार्यवाही याची रंगीत तालीम असल्याचं कळल्यावर ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. 

कोणती काळजी घेणं गरजेच 
या वेळी दापोली तालुक्‍याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आपण समुद्राच्या खूप जवळ राहात असून त्सुनामी आल्यावर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? आपल्या राहत्या घरातून ताबडतोब बाहेर पडणे गरजेचे आहे. कोणीही या घटनेमध्ये दगावणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. तातडीने कोणकोणत्या संबधित खात्याला कळवलं पाहिजे याची माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration Of Phattegad Villagers Due To Tsunami Message