esakal | कोकणच्या मिनी महाबळेश्‍वरातील पर्यटनाला खो; दोन हजार कुटुंबांना फटका

बोलून बातमी शोधा

mini lockdown effect on tourism in konkan mini mahabaleshwar dapoli

परिणामी तालुक्‍याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असलेला पर्यटन व्यवसाय पूर्णतः कोलमडून गेला आहे. 

कोकणच्या मिनी महाबळेश्‍वरातील पर्यटनाला खो; दोन हजार कुटुंबांना फटका
sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : मागील वर्षीच्या कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले दापोलीतील अर्थचक्र सावरण्याच्या स्थितीत असतानाच पुन्हा विकेंड लॉकडाऊन व त्यानंतर होणाऱ्या वाढीव लॉकडाऊनमुळे दापोली तालुक्‍यातील अर्थचक्र थांबले आहे. परिणामी तालुक्‍याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असलेला पर्यटन व्यवसाय पूर्णतः कोलमडून गेला आहे. 

कोकणचे मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या या तालुक्‍याला ऐतिहासिक, धार्मिक पार्श्‍वभूमी लाभली आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय हा चांगल्या प्रमाणात बहरला आहे. केळशी, आंजर्ले, हर्णे, पाळंदे, मुरुड, कर्दे, सालदुरे, लाडघर, कोळथरे या गावांमध्ये अनेकांनी रिसॉर्ट, होम स्टे आदी व्यवसाय सुरु करुन दापोलीतील अर्थचक्राला हातभार लावला आहे. या गावांमधून सुमारे पाचशेहूनही अधिक व्यावसायिक आहेत. तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची संख्याही सुमारे 2 हजारहून अधिक आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीत जमावबंदीचे नियम धाब्यावर; यंत्रणेकडूनही डोळेझाक

गेल्या वर्षात या व्यावसायिकांनी मार्च ते ऑक्‍टोबर या ऐन हंगामाच्या वेळी आपले उद्योगधंदे बंद केले, ते वर्षाअखेरीला काही प्रमाणात सुरु झाले असतानाच पुन्हा विकेंड लॉकडाऊन व अन्य बाबी सुरु झाल्या. मुंबई, पुणे, नाशिक या मोठया शहरांमधून कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळत असल्याने पर्यटकांनी लॉकडाऊनपूर्वीच या पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली होती. 

व्यवसायाला पुन्हा चालना द्या 

या व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते, नोकरांचा पगार, हॉटेल व अन्य सुविधांचा देखभालीचा खर्च, शासनाचे विविध कर भरावे लागत असून यामुळे हे व्यावसायिक मोठया प्रमाणात कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. याबाबत शासनाने नवे धोरण आखून पर्यटन व्यवसायाला पुन्हा चालना द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

दृष्टिक्षेप.. 

  • अनेकांनी रिसॉर्ट, होम स्टे आदी व्यवसाय केला सुरु 
  • केळशी, आंजर्ले, हर्णे, पाळंदे, मुरुडही केंद्रबिंदू 
  • कर्दे, सालदुरे, लाडघर, कोळथरे या गावांचा समावेश 
  • संबंधित गावांमधून सुमारे 500 हूनही अधिक व्यावसायिक