राज्याचे नेते म्हणणाऱ्यांची दरवाजा आडून भाजपशी चर्चा

राज्याचे नेते म्हणणाऱ्यांची दरवाजा आडून भाजपशी चर्चा

देवगड - राज्यात युतीचे सरकार असले तरी आगामी निवडणुकीसाठीचा महायुतीचा अंतिम निर्णय प्रदेशाचे नेते घेतील. अन्य पक्षांची चिंता करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसच आपला उमेदवार मानून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जामसंडे येथे केले. राज्याचा नेता म्हणवणारे दरवाजा आडून भाजपशी चर्चा, संवाद तसेच आशीर्वाद मागत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजप बूथप्रमुख आणि कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी पक्षाची ध्येयधोरणे, विजयाची रणनीती, केंद्र आणि राज्यातील सरकारचे काम, विरोधकांची ईव्हीएमबाबतची ओरड या अनुषंगाने शेलार यांनी चौफेर फटकेबाजी केली. कार्यकर्त्यांमधून मंत्री झाल्यानंतर पाण्यावाचून मासा अशी अवस्था झाल्याचे सांगितले. युती असून भविष्यातही राहील, असे सांगतानाच महायुतीच्या चर्चेपेक्षा कार्यकर्त्यांनी २८८ मतदारसंघाचे उमेदवार फडणवीस असल्याचे मानून काम करण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे सांगितले. 

मंत्री झाल्यानंतर प्रथमच दौऱ्यावर आलेल्या शेलारांचा मतदारसंघातर्फे सत्कार झाला. या वेळी भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, संघटनमंत्री सतीश धोंड, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, प्रभाकर सावंत, राजू राऊळ, सभापती जयश्री आडिवरेकर उपस्थित होते. 

नाव टाळत नारायण राणेंच्या पुस्तकाचा आधार घेत शेलार म्हणाले, ‘‘आपण कसा घडलो इथपासून संघर्ष कसा केला. उत्कर्षातील अडथळे, मदत कोणी केली आदीचा उल्लेख पुस्तकात असला तरी सर्वच ठिकाणी ‘मी’ असल्याचे जाणवले. भाजपमध्ये ‘मी’ नसून ‘आम्ही’ असा शब्दप्रयोग असतो. प्रथम राष्ट्रप्रेम मग पक्ष नंतर ‘मी’ असतो. त्यामुळे राष्ट्र, पक्षासाठी मी काय करणार याकडे बूथप्रमुखांनी लक्ष द्यावे.

पक्षाची विचारधारा महत्त्वाची असून, समाजाचे दुःख आपले मानून काम केले पाहिजे. विरोधकांची ईव्हीएम ओरड असली तरी ईव्हीएम म्हणजे ‘प्रत्येक मतदाराच्या मतदानासाठी संचलन’ ही भाजपची भूमिका आहे.’’ प्रास्ताविक गोगटे यांनी केले. सूत्रसंचालन जयदेव कदम यांनी केले.

चिखलातून कमळ फुलवण्याची जाणीव ठेवा
अधिकाऱ्यांवर चिखल फेकून अधिकार दाखवण्यापेक्षा चिखलातून कमळ फुलवण्याची जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवावी. कणकवलीमधून देवेंद्र फडणवीस रूपी उमेदवार विजयी करू, असा विश्‍वास आशिष शेलार यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com