
मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांचे बॅनरवरून फोटोच गायब
दाभोळ - दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 निमित्त आज दापोली येथील केळसकर नाका येथे शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीची जाहीर प्रचार सभा आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेच्या स्टेजवर लावलेल्या बॅनर वरून शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे फोटोच गायब होते, तर सात वर्षानंतर माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा फोटो मात्र या फ्लेक्सवर लावण्यात आल्याने शिवसैनिकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. शेवटच्या दिवशी शिवसेना राष्ट्रवादी आघाडी जाहिर करण्यात आली. यात शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी व त्यांचा गट पुन्हा सक्रिय झाला व त्यांना शिवसेनेचे तिकीट वाटपाचे अधिकार देण्यात आले. या निवडणुकीत शिवसेनेला 8 तर राष्ट्रवादीला 9 उमेदवारी देण्यात आली, या सर्व प्रक्रियेतून शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांना वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या उमेद्वारांविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा: पाली : सुधागड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज सायंकाळी जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होते, या सभेसाठी दापोलीत दोन्ही पक्षाचे बॅनर, झेंडे लावण्यात आले होते.
मात्र, या बॅनरवरून शिवसेनेचे कोकणातील नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे फोटो लावण्यात आलेले नव्हते, स्टेजवरील बॅनर वर माजी खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सूर्यकांत दळवी, युवासेनेचे नेते अमोल कीर्तिकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे व सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत, दापोलीचे आमदार योगेश कदम यांना दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत तिकीट वाटपात स्थान न देणे नंतर बॅनरवर फोटो न लावणे या सर्व प्रकारामुळे शिवसैनिकात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे, याचा नक्की अर्थ काय लावायचा असा विचार आता शिवसैनिक करत आहेत.
Web Title: Minister Ramdas Kadam Yogesh Kadam Photo Missing On Banner Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..