आकारीपड जमिनीचा मसुदा चार दिवसात मंत्रालयात पाठवा -  रविंद्र चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कुडाळ - माणगांव खोऱ्यातील आकारीपड जमिनीच्या तयार करण्यात आलेल्या मसुद्यातील तांत्रिक दुरूस्त्या करून येत्या चार दिवसात परिपूर्ण मसुदा मंत्रालयात पाठवा, असे आदेश राज्यांचे बंदर विकास व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांना दिले.

कुडाळ - माणगांव खोऱ्यातील आकारीपड जमिनीच्या तयार करण्यात आलेल्या मसुद्यातील तांत्रिक दुरूस्त्या करून येत्या चार दिवसात परिपूर्ण मसुदा मंत्रालयात पाठवा, असे आदेश राज्यांचे बंदर विकास व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांना दिले.

या मसुद्याच्या प्रस्तावावर मंत्रालय पातळीवर 16 ला महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. येथे दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री चव्हाण यांनी एमआयडीसी येथे आकारीपड प्रश्‍नी प्रांताधिकारी सुर्यवंशी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी भाजपचे प्रदेश प्रतिनिधी अतुल काळसेकर, आकारीपड जमिनीचे अभ्यासक बाळ सावंत, निलेश तेंडुलकर, भाजपचे दादा बेळणेकर, किशोर शिरोडकर उपस्थित होते. 1970 मध्ये आकारीपड जमिन वनाकडे वर्ग केली गेली. याकडे बाळ सावंत यांनी श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधले. मंत्री चव्हाण यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना याबाबत सर्व्हे करण्याचे आदेश दिले.

आठही धरण प्रकल्प सुरक्षित

तिवरे धरण फुटीच्या पार्श्‍वभुमीवर राज्यमंत्री चव्हाण यांनी तालुक्‍यातील धरण प्रकल्पांचा आढावा घेतला. तालुक्‍यात एकूण आठ धरण प्रकल्प असुन हे सर्व धरण प्रकल्प सुस्थितीत असल्याची माहिती मध्यम पाट बंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन या प्रकल्पांचे मॉनिटरींग होत असुन नदीच्या पातळीत वाढ होते की नाही याकरीता कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती नसल्याचे सांगितले.

पावसाळी मौसम आहे काळजी घ्या, असा सल्ला मंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. यावेळी उपअभियंता मंदार गाडगीळ, विवेक नानल, बाळा आगलावे आदी अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Ravindra Chavan comment