परिवहनमंत्री आज कणकवलीत ; असा आहे त्यांचा दौरा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

ॲड. अनिल परब आज सकाळी ११ वाजता पाहणी करणार आहेत  

कणकवली : एसटी आगारातील भव्य व्यापारी संकुल आणि अद्ययावत बसस्थानक उभारण्याच्या दृष्टीने राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब आज सकाळी ११ वाजता पाहणी करणार असल्याची माहिती कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

एसटी स्टॅंड, एसटी डेपो आणि एसटी ऑफिसर कॉलनी व लगतच्या परिसरात एसटीच्या मालकीची एकूण ३०४ गुंठे जमीन आहे. त्यासोबत आरक्षित असलेली १०० गुंठेहून अधिक जमीन आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी नव्याने होत असलेल्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गालगत ही जमीन आहे. अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या या जागेत भव्य व्यापारी संकुल व्हावे, यासाठी पारकर प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा - प्रेरणादायी! जलचरांचा प्रथम विचार, मळगावच्या मूर्तीकाराचा अनोखा प्रयोग...

राज्याचे परिवहन मंत्री ॲड. परब हे सिंधुदुर्गचे सुपुत्र असून गणेश चतुर्थी सणासाठी हरकुळ खुर्द गावातील आपल्या निवासस्थानी आले आहेत. पारकर यांनी आज परिवहन मंत्री परब यांच्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी जात गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर कणकवली एसटी स्टॅंड जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत आज पुन्हा विस्तृत चर्चा केली. एसटीच्या मालकीच्या एस्टीस्टॅण्ड परिसरातील जागेत पीव्हीआरच्या धर्तीवर भव्य व्यापारी संकुल उभारणीस परिवहन मंत्री परब यांनी यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली आहे. आज सकाळी ११ वाजता यासंदर्भात प्रत्यक्ष एसटी स्टॅंड व परिसराच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी ॲड. परब करणार आहेत. शहरातून गेलेल्या नॅशनल हायवेचे चौपदरीकरण झाल्यामुळे शहरातील शेकडो स्टॉलधारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

हेही वाचा -  किती निष्काळजीपणा? देवगड-निपाणी मार्ग सात तास का झाला ठप्प? 

एसटीच्या मालकीच्या या जागेत पीव्हीआर मॉलच्या धर्तीवर भव्य व्यापारी संकुल आणि अद्ययावत एसटी स्टॅंड उभारावे, यासाठी परिवहन मंत्री ॲड. परब, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्याकडे श्री. पारकर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच अलीकडेच १८ जुलैला पालकमंत्री सामंत यांनी आमदार नाईक, श्री. पारकर, सतीश सावंत यांच्यासोबत कणकवली एसटी स्टॅंड येथे प्रत्यक्ष भेट देत या जागेची पाहणी केली होती. यावेळी एसटीचे विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister of transport ad anil parab visit to kankavli in sindhudurg