
पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानतंर उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यांची सुरूवात वैभववाडी तालुक्यातुन झाली. येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला.
उदय सामंत म्हणाले, कणकवलीबाबत 'आमचं ठरलंय'
वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे त्या वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा विरोधकांना देतानाच पर्यटनदृष्या गोव्यापेक्षा सरस काम सिंधुदुर्गात केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानतंर उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यांची सुरूवात वैभववाडी तालुक्यातुन झाली. येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अरूण दुधवडकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, निलम सावंत, दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, पल्लवी झिमाळ, मंगेश लोके, नंदु शिंदे, दिपक पांचाळ, संभाजी रावराणे, अंबाजी हुंबे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - मुलीकडचे म्हणून कोंडगावकरांकडे दुर्लक्ष नको
सर्वांना विश्वासात घेऊन विकास साधणार
मंत्री श्री. सामंत म्हणाले, ""राज्यात सर्वात चांगला विकास करण्याची संधी सिंधुदुर्गात आहे. पर्यटनदृष्ट्या विकासाला येथे मोठा वाव आहे. त्यादृष्टीने येत्या काळात अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. सिंधुदुर्गसारखा गोव्याचा विकास करा, अशी गोव्यातील जनता म्हणेल असा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हा विकास करताना सर्वाना विश्वासात घेतले जाईल. जिल्ह्यातील शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कॅबिनेटमंत्री आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता हा वाघ आहे. त्यामुळे कुणीही वाघाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करू नये. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.''
हेही वाचा - लांजा नगरपंचायतीवर यांचा झेंडा
संघटनेला प्राधान्य
अरूण दुधवडकर म्हणाले, ""संघटनेला प्राधान्य देणारा पालकमंत्री जिल्हयाला मिळाला आहे. संघटनावाढीसाठी पालकमंत्री अधिक वेळ देतील.'' अतुल रावराणे म्हणाले, ""पालकमंत्री उदय सामंत हे विकासाचा धडाका सर्वश्रुत आहे. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गात सुध्दा ते विकास करतील.''
संकल्प कणकवलीचा
कणकवली-देवगड-वैभववाडीचा पुढचा आमदार हा शिवसेना महाविकास आघाडीचा करण्याचा संकल्प निश्चित करूनच आजच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. या मतदारसंघात भगवा फडकविणारच असे मत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केले.
फुकट जाणार नाही आणि पश्चातापही नाही
पालकमंत्री म्हणुन वैभववाडीत आल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यानी मनापासुन सत्कार केला. हा सत्कार फुकट जाऊ देणार नाही आणि सत्कार केला म्हणुन कार्यकर्त्याना पश्चातापही होणार नाही, याची हमी पालकमंत्री सामंत यांनी कार्यकर्त्याना दिली.