लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच ः पालकमंत्री सामंत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

लॅबमध्ये रोज सुमारे 100 स्वॅब टेस्टिंग केले जातात. आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्वांना डिस्चार्ज दिला आहे.

सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कोरोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा लॉकडाउन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाउनबाबतचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा आज पालकमंत्री सामंत यांनी घेतला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते. 

पालकमंत्री म्हणाले, ""कोरोनावर मात करण्यासाठी या संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी कडक लॉकडाउन केले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 67 टक्के असून मृत्युदर 2.2 टक्के आहे. आर.टी.पी.सी.आर. लॅबमध्ये रोज सुमारे 100 स्वॅब टेस्टिंग केले जातात. आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्वांना डिस्चार्ज दिला आहे.

आतापर्यंत 3967 स्वॅब टेस्टिंग झाल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 69 रुग्ण उपचार घेत आहेत. लॉकडाउनमुळे ही संख्या आणखी कमी होऊ शकेल.'' 
दरम्यान, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले, ""जिल्ह्यामध्ये पोलिस बंदोबस्त चोख आहे तसेच रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशांच्या ठिकाणी नाकाबंदी करुन येणाऱ्यांची पूर्ण चौकशी करुन जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.'' 

गणेश मंडळांना आवाहन 
पालकमंत्री सामंत म्हणाले, ""नजीकच्या काळामध्ये गणपती उत्सव आला असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी गणपतीसाठी येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करावी. नियोजनाचा आराखडा तयार करावा. आराखडा मंजुरीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले जातील. समिती गठित करताना गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व घरगुती गणपतींच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. लालबागचा राजा गणपती मंडळाने जो उपक्रम यंदा हाती घेतला आहे त्या धर्तीवर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी आरोग्य उपक्रम हाती घ्यावेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Uday Samant Statement lockdown issue konkan sindhudurg