सिंधुदुर्गात गांजा खरेदीमागे मिरज कनेक्शन

miraj connection hemp issue sindhudurg
miraj connection hemp issue sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वारगाव येथे गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस तपासात आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती पुढे आली असून गांजाचे रॅकेट पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांपर्यंत पोचले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांजाचा पुरवठा मिरज येथून होत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

जिल्ह्यात एकीकडे गोवा बनावटीच्या दारूचा अवैध धंदा फोफावला असून आता नव्याने गांजा तस्करीची डोकेदुखी पुढे आली आहे. यात काही तरूण सहभागी असल्याचे निष्पन्न होऊ लागले आहे. जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चार दिवसापूर्वी वारगाव येथून सातशे ग्रॅम गांजा छापा टाकून ताब्यात घेतला होता. याप्रकरणी संशयित प्रविण गुरव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याआधी कुडाळात स्थानिकांनी गांजा विक्रीचा संशय आल्याने काहींना रंगेहाथ पकडले होते. याआधीही असे प्रकार उघड झाले आहेत. 

आता अमली पदार्थातील हे रॅकेट शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने तब्बल एक किलो गांजा खरेदी केला होता. हा गांजा तो कमी किंमतीत खरेदी करत असे आणि जिल्ह्यातील ग्राहकांना 300 रुपये दहा ग्रॅम या भावाने विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात गांजाचे मोठे रॅकेट पोलिसांनी पकडले होते. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये गांजाचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. हे कनेक्‍शन सिंधुदुर्गपर्यंत पोहोचले आहे. संशयिताने एसटी बसमधुन गांजा वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही खरेदी त्याने मिरजेतून केली आहे. असे प्रकार जिल्ह्याच्या इतर भागात असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

चिंतेचा विषय म्हणजे गांजाच्या खरेदीतील ग्राहक प्रामुख्याने तरूण आहेत. वारगावपर्यंत काही तरूण गांजा खरेदीसाठी जातात ही माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. गांजा शेतीची लागवड विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये होत आहे. रेल्वेमधून मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक होते. याकडेही आता पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. 

गोवा कनेक्‍शन नाही ना? 
सिंधुदुर्गालगतचे गोवा हे अमली पदार्थ व्यवहारातील ट्रेडींग सेंटर मानले जाते. तेथूनही सिंधुदुर्गाशी कनेक्‍शन असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गोव्यामध्ये या काळ्या धंद्यात काही प्रमाणात मुळ सिंधुदुर्गातील काही तरूण अडकल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. 

गांजा रॅकेटच्या मुळपर्यंत जाणार आहोत. जिल्हा अमलीपदार्थ अवैध धंदा रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. गांजा मोठ्या प्रमाणात पश्‍चिम महाराष्ट्रातून येत असल्याचा अंदाज आहे. संशयिताने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुळ रॅकेटपर्यंत नक्कीच पोहोचू. 
- आर. बी. शेळके, एएसआय, स्थानिक गुन्हा अन्वेशन. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com