
तालुक्यातील मिरजोळे घवाळेवाडीच्या सड्यावर एका शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघड झाला.
रत्नागिरीत दगडांनी ठेचून 'या' शाळकरी मुलाचा केला खून.....
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे घवाळेवाडीच्या सड्यावर एका शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघड झाला. १२ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या निखिल अरुण कांबळे (वय १३) या सातवीतील चिमुरड्याचा खून झाल्याचे उघड झाले आहे. त्याचा मृतदेह चरात टाकून त्यावर मोठे दगड ठेवून तो लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १२ दिवसांपूर्वी खून झाल्याने मृतदेह सडून दुर्गंधी पसरली होती.
आर्थिक व्यवहारातून खून झाला असून, संशयित पोलिसांच्या टप्प्यात आहे. मिरजोळे पाडावेवाडीजवळच्या नव्या वसाहतीत कांबळे कुटुंबीय भाडेतत्वावर राहते. निखिल ११ फेब्रुवारीला सेंट थॉमस शाळेतून दुपारी अडीचच्या सुमारास घरी परतला होता. त्यानंतर शिकवणीला जातो, असे आजीला सांगून तो घराबाहेर पडला. सायंकाळी त्याची आई अनुष्का कांबळे घरी आल्यानंतर त्यांनी निखिलची चौकशी केली. तो शिकवणीला गेल्याचे आजीने सांगितले. निखिलला कोणीही न पाहिल्याने शोधाशोध सुरू झाली. तो आढळुन न आल्याने १२ फेब्रुवारीला निखिल बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात
देण्यात आली.
हेही वाचा - ८० व्या वर्षाच्या आजींने ओलांडली पुस्तकांची पन्नाशी...
आर्थिक व्यवहारातून खून झाला
पोलिस उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांनी रेल्वे, बसस्थानकासह अन्य ठिकाणी निखिलचा शोध घेतला होता; परंतु अखेरपर्यंत तो सापडला नाही. आज सकाळी मिरजोळे घवाणवाडी-सडा येथे प्रभाकर करंदीकर यांच्या समाईक जागेत निखिलचा मृतदेह आढळला. तेथेच शेजारी असलेल्या बागेत एक कामगार वानर हाकविण्यासाठी सड्यावर गेला होता. त्याला झुडपाजवळ दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्याने जवळ जाऊन पाहिल्यानंतर मोठ्या दगडांखाली सडलेला मृतदेह दिसला. यानंतर याची माहिती आपल्या मालकांना दिली. त्यांनी शहर पोलिसांना खबर दिली.
हेही वाचा - यंदा मुंबईकरांची उन्हाळी सुटी होणार स्पेशल...का ते वाचा..?
मृतदेह पूर्णतः सडलेला होता
माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगणे, निरीक्षक अनिल लाड, निरीक्षक शिरीष सासने, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम, अनिल विभुते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुढे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड दाखल झाले. दगडाखाली असलेला मृतदेह पूर्णतः सडलेला होता. कवटी, अंगावरील ड्रेस, चप्पल यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात काही अंतरावर शाळेचे दप्तर सापडले. यावरून पोलिसंची खात्री झाली की हा मृतदेह बारा दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या निखिलचा असावा.
पोलिसांनी तत्काळ नातेवाईकांना बोलावून खातरजमा केली. हा मृतदेह निखिलचा असल्याचे आई वडिलांनी ओळखले. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचे बोलले जाते. निखिलची आजी निवृत्त शिक्षिका आहे. तिच्या एटीएममधुन तो पैसे काढत असल्याची चर्चा आहे. त्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
हेही वाचा - देवगडात 5 मार्चपासून भारतीय चित्रपट महोत्सव : दिग्दर्शक राजदत्त आणि ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना जीवन गौरव पुरस्कार...
आईने हंबरडा फोडला
१२ दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या निखिलचा मृतदेह असल्याचे नातेवाईकांनी ओळखले आणि निखिलच्या आईने हंबरडा फोडला. त्यांची अवस्था पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
संशयित पोलिसांच्या टप्प्यात?
निखिलच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील मोबाईल टॉवरच्या अखत्यारित येणाऱ्या मोबाईलचे सीडीआर पोलिसांनी मागविले आहेत. त्या भागात या कालावधीत कोण-कोण आले होते, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यानुसार संशयित पोलिसांच्या टप्प्यात असल्याचे कळते.