राष्ट्रवादी पक्षांतर्गत लाथाळ्यांनी 'हे' हैराण; म्हणून जाणार शिवसेनेत 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 August 2019

चिपळूण - शरद पवार यांनी मला पुष्कळ दिले. पण, पक्षांतर्गत लाथाळ्यांनी हैराण आहे, असे सांगत शिवसेनेतच प्रवेश करण्याचे संकेत आमदार भास्कर जाधव यांनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. भारतीय जनता पक्षात मी जाणार नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहू इच्छित नाही, असे सांगत शिवसेनेचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

चिपळूण - शरद पवार यांनी मला पुष्कळ दिले. पण, पक्षांतर्गत लाथाळ्यांनी हैराण आहे, असे सांगत शिवसेनेतच प्रवेश करण्याचे संकेत आमदार भास्कर जाधव यांनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. भारतीय जनता पक्षात मी जाणार नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहू इच्छित नाही, असे सांगत शिवसेनेचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते आजमावण्याचा जाधव यांचा पवित्रा होता. अपेक्षेप्रमाणे कार्यकर्त्यांनी तुम्ही तेथे आम्ही, असा नेहमीचाच राग आळवला. आपण चिपळुणातून लढला तर गुहागरचे काय, या प्रश्‍नावर गुहागर माझ्याच अधिपत्याखाली राहील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांना नेमके काय ते कळले. गुहागरमधून विक्रांत जाधव यांना "राष्ट्रवादी'ने तिकीट नाकारले व पवार यांनी आपल्यालाच लढायला सांगितले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावर जाधव यांनी चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यातील समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या सर्वांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, तुम्ही तिथे आम्ही येऊ, असा शब्द दिला. जाधव यांनी पक्ष सोडण्याचा अथवा सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला नाही. सेनेत प्रवेश झाल्यास गुहागर आपल्याच अधिपत्याखाली असेल, असे सूचक सांगितले. त्यामुळे जाधव लवकरच शिवबंधनात अडकतील, याबद्दल कार्यकर्त्यांची खात्री झाली. 

बांदल हायस्कूल येथील सभागृहात ही बैठक झाली. या वेळी गुहागर तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, माजी सभापती बळिराम शिंदे, पंचायत समितीचे सदस्य नंदकुमार शिर्के, पांडुरंग माळी, जिल्हा परिषदेच्या सदस्या मीनल काणेकर, दिशा दाभोळकर, पूनम चव्हाण, माजी सभापती सुरेश खापले, माजी उपसभापती संतोष चव्हाण, संचिता केंबळे, उद्योजक वसंत उदेग, संदीप चव्हाण, महेंद्र कदम आदी उपस्थित होते. 

न येणाऱ्यांबद्दल कटुता नसेल 
जाधव म्हणाले, की शरद पवार यांनी मला भरपूर दिले; पण स्थानिक स्तरावर अंतर्गत लाथाळ्या झाल्या, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली तरी पक्षप्रवेशाचा निर्णय आपण घेतला नाही. समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेत निर्णय घ्यायचे आपण ठरविले होते. भाजपमध्ये मी जाणार नाही. मी जिथे असेन तिथे तुमचे मला सहकार्य पाहिजे. जे येतील त्यांना घेऊन जाणार, जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल कटुता नसेल. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhaskar Jadhav Comment