नारायण राणेंचा सावंतवाडी नगरपालिकेसाठी 'हा' डाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

हे शहर आधुनिकीकरणाकडे घेऊन जात असतानाच येत्या 4 जानेवारीपासुन वायफाय सेवा संपुर्ण शहरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - महाविकास आघाडीतुन बाहेर पडत कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या दिलीप नार्वेकरांची उमेदवारी हा नारायण राणे यांचा डाव असल्याची टीका माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे करत सावंतवाडीकरांनी या डावाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

हे शहर आधुनिकीकरणाकडे घेऊन जात असतानाच येत्या 4 जानेवारीपासुन वायफाय सेवा संपुर्ण शहरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. 
येथील श्रीधर अर्पाटमेंट या आपल्या निवासस्थानी माजी पालकमंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जावेद शेख, राजन पोकळे, शैलेश गवंडळकर, मयु पटेकर, राहुल नाईक, नंदु शिरोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - अबब ! खाद्यतेलाच्या दराने ओलांडली शंभरी; काय आहेत कारणे ? 

२९ तारखेपर्यंत मी सावंतवाडीतच

श्री. केसरकर म्हणाले, ""सावंतवाडी नगरपालिका ही माझ्या घराप्रमाणे आहे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात जाण्याचा योग मला पुन्हा आला आहे. येत्या 29 तारीखेपर्यंत त्यानिमित्ताने मी सावंतवाडी शहरातच ठाण मांडून राहणार आहे. यापुढे आठवड्यातून दोन दिवस जिल्ह्यात तसेच सावंतवाडी शहरासाठी देणार आहे. यामुळे शहरात मंजूर झालेली कामांना वेग देऊन हे शहर राज्यातील एक नंबरचे शहर बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.'' 

चार जानेवारीपासून सावंतवाडीत मोफत वायफाय सेवा

सावंतवाडी शहराला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जात असताना मला सार्थ अभिमान वाटत आहे. त्यामुळे येत्या 4 जानेवारीपासून सावंतवाडी शहरात मोफत वायफाय सेवा सुरु करण्यात येणार असून याच दिवशी सेटअप बॉक्‍स ही वितरण करण्यात येणार आहे. सेटअप बॉक्‍स कंपनीचे उद्‌घाटनही याच दरम्यान होणार असल्याने तेराशे युवकांना संधी येथे प्राप्त होणार आहे, असे केसरकर म्हणाले. 

हेही वाचा - धक्कादायक ! मित्राला फॅक्टरी काढण्यासाठी केलेली मदत बेतली जिवावर 

ऍमेझॉन पार्क मोनोरेल प्रकल्प लवकरच

चष्मा कंपनीच्या माध्यमातून येथील युवकांना फसवल्याचे बोलणाऱ्या राजन तेली यांनी येत्या 4 ला उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी टीकाही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, ""आचारसंहितेअभावी या कंपनीचे उद्घाटन करता येत नाही या अडचणीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली होती. शहरातील उद्यानात ऍमेझॉन पार्क मोनोरेल प्रकल्प लवकरच सुरू होत आहेत तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व पाच कोटी रुपयाचं मागासवर्गीय वसतीगृह शहरात उभे राहणार आहे. कोकणातील पहिलं तारांगण नरेंद्र उद्यान पायथ्याशी मंजूर आहे. योगा सेंटरही याठिकाणी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटकांचा ओढा वाढेल.''

यासाठीच कुडतरकर यांना संधी

श्री. केसरकर म्हणाले, ""नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण हे खुले प्रवर्गात असल्याने याठिकाणी बाबू कुडतरकर यांना संधी देण्यात आली आहे. ज्यावेळी ओबीसी प्रवर्गासाठी हे आरक्षण पडेल. त्यामुळे त्यांना नक्कीच संधी देण्यात येईल. त्यामुळे याठिकाणी पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा असून शिवसेना सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे.'' 

राणेंना नैतिक अधिकार नाही 

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नारायण राणे जिल्हा नियोजनमधुन सावंतवाडी शहराला तीन कोटी रुपये देऊ शकले तर मी पालकमंत्री असताना या शहरासाठी 28 कोटी रुपये दिले. हा माझा आणि राणे यांच्यामधील फरक असून राणे यांना या शहरात येण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केसरकर यांनी केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Deepak Kesarkar Comments On Narayan Rane Sindhudurg Marathi News