...तर जनता पेटून उठेल ः केसरकर

भूषण आरोसकर
Sunday, 29 November 2020

येथील पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची तातडीची बैठक आमदार केसरकर यांनी निवासस्थानी शुक्रवारी (ता.27) रात्री घेतली. ते म्हणाले, की शहरासाठी मार्चपूर्वी 11 कोटींचा निधी दिला आहे. तो योग्य प्रकारे उपयोगात आणला जातो आहे का? याकडे लक्ष द्या.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरामध्ये स्टॉलचे पुनर्वसन नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत झाले आहे. त्यामुळे नवीन अतिक्रमण करणाऱ्यांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना असायला हवी. तरीही अतिक्रमण करणाऱ्यांना पाठिंबा दिल्याचे सिद्ध झाले तर नगरसेवक असो अगर नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. अनाचार वाढला तर जनताच पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

येथील पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची तातडीची बैठक आमदार केसरकर यांनी निवासस्थानी शुक्रवारी (ता.27) रात्री घेतली. ते म्हणाले, की शहरासाठी मार्चपूर्वी 11 कोटींचा निधी दिला आहे. तो योग्य प्रकारे उपयोगात आणला जातो आहे का? याकडे लक्ष द्या. नव्याने 5 कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासकामांसाठी देणार आहे. त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे, याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी तालुकाप्रमुख राऊळ, नगरसेवक बाबू कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, लोबो, शुभांगी सुकी, सुरेंद्र बांदेकर, दीपाली सावंत, भारती मोरे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते. 

नगरसेवकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""पालकमंत्री असताना नियोजनचा 250 कोटींचा आराखडा केला होता. पालकमंत्री असल्याने पालिकेला 11 कोटींचा निधी दिला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोणी बतावणी केली तर ती जनता त्याला ग्राह्य धरणार नाही. दरम्यान, तालुक्‍यात लेप्टो आणि माकडताप रुग्ण आहेत. या रुग्णांवर प्रतिबंधक उपाय केले जातील. तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये यंत्रणा सज्ज आहे.'' 

...तर मुख्याधिकारी जबाबदार 
शहरात स्टॉलचे पुनर्वसन केले आहे. तरीही अनधिकृत स्टॉल उभारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला मुख्याधिकारी जबाबदार आहेत. अनधिकृत इमारत, स्टॉल उभारले तर मुख्याधिकाऱ्यांनी रोखले पाहिजेत. अनधिकृत कामांना पाठिंबा देणारे नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla deepak kesarkar press conference