सावंतवाडीच्या सौंदर्याला बाधा नको ः केसरकर

रुपेश हिराप
Thursday, 28 January 2021

मनाला वाटेल तेथे स्टॉल उभे करून शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही, अशी खबरदारी घेतली पाहिजे, असे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  शहराला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी स्टॉल पुनर्वसन केले. यापुढेही शहर विकासासाठी नियोजन आवश्‍यक आहे. मनाला वाटेल तेथे स्टॉल उभे करून शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही, अशी खबरदारी घेतली पाहिजे, असे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. 

श्री. केसरकर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ""गोरगरिबांचे स्टॉल पुनर्वसन केले पाहिजे. जागोजागी नुसते स्टॉल उभारून शहर भकास करणे योग्य नाही, हे चुकीचे आहे आणि याला पायबंद बसला पाहिजे. त्यामुळे वाटेल तेथे स्टॉल उभारू दिले तर योग्य होणार नाही. फुटपाथ लोकांना चालण्यासाठी माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बांधले आहेत. त्याच्यावर बाजार बसवणे चुकीचे आहे. ही बाब आपण नगरविकास मंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. मुळात हा बाजार उभाबाजार येथे बसवण्यात येत होता. यामागे उभा बाजाराला उर्जितावस्था आणणे हा हेतू होता. आता पालिकेच्या विकासाची दिशा ठरवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुनर्वसनही होणे गरजेचे आहे. वाटेल तसे स्टॉल दिले जातात त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार झाल्याचे मी ऐकून आहे.

नगराध्यक्षांनी वर्षपूर्तीचा कार्यक्रम साजरा केला, या सर्व कामांसाठी 95 टक्के निधी मी पालकमंत्री म्हणून दिलेला आहे. जिल्हा नियोजनमध्ये पर्यटन, नगरविकास, दलित वस्ती वैशिष्टपूर्णचा कार्यक्रम असू द्या, वेगळ्या कार्यक्रमांतर्गत निधी दिला आहे.'' 
ते म्हणाले, ""मी पालकमंत्री असताना कोट्यावधीचा निधी आणलेला आहे; मात्र हे जनतेला सांगितले जात नाही. कोट्यावधी रुपयांचा निधी मी दिला आहे, आता सुद्धा देत राहणार आहे. विकासात कधीही मी राजकारण आणत नाही. ज्यांचा कारभार योग्य आहे, त्यांनी चौकशीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. मी दिलेला विकास निधी हा जनतेसाठी आहे जनतेच्या कल्याणासाठी आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये फार मोठा फरक पडलेला नाही, तरीसुद्धा मला दुःख आहे. कोलगाव आणि मळेवाडमध्ये एवढा मोठा फरक मतांमध्ये पडला असून याचे आत्मचिंतन निश्‍चित करावे लागणार आहे. मी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला नाही. मतदार संघात शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी सात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यश मिळाले आहे. काही ग्रामपंचायतीत एका जागेचा फरक, एका ठिकाणी गाव पॅनेल तर एका ठिकाणी समान सदस्य आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारामध्ये मी स्वतः असणार आहे.'' 

रेडीचा कायापालट होणार 
रेडी, आरोंदा व शिरोडा असे एक पर्यटन सर्किट रेडी केंद्र बिंदू ठरवून तयार करायचे आहे. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक दिली जाणार आहे. शिवाय टाटा मेटालिकमध्ये सुद्धा मोठा प्रकल्प येणार आहे. टाटा मेटॅलिक शंभर एकरमध्ये आहे. विदेशी गुंतवणूक येणार तेव्हा त्यांना मोठ्या जागा लागतात आता 500 एकर जागा त्या भागांमध्ये आवश्‍यक आहे. ही जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असल्यामुळे रेडीचा पूर्णपणे कायापालट होणार आहे, असे ते म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla Deepak Kesarkar Statement stall issue Sawantwadi konkan sindhudurg