जिल्ह्यात कोरोनाचा केवळ बाऊ ः आमदार राणे

नंदकुमार आयरे
Tuesday, 20 October 2020

जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्यावतीने आज वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक विनोद दळवी यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी - शासन आणि प्रशासनाने नाहक कोरोनाचा बाऊ केला आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवणे सहज शक्‍य होते; मात्र त्यासाठी योग्य नियोजनाची गरज होती, असे मत आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या वार्तालाप कार्यक्रमात व्यक्‍त केले. 

जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्यावतीने आज वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक विनोद दळवी यांनी केले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा मुख्यालय संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, बाळ खडपकर, नंदकुमार आयरे, संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, लवू महाडेश्‍वर, रवी गावडे, मनोज वारंग, विनोद परब, प्रसाद पाताडे, गुरुप्रसाद दळवी, सतीश हरमलकर आदी पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, ""देवगड आणि वैभववाडी तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित करताना कणकवली बाजारपेठेला गतवैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने प्रयत्न आहेत. येथील रस्ते, पाणी, वीज या समस्यांबरोबरच आवश्‍यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात चांगले प्रकल्प आणले तरच जिल्ह्याचा झपाटाने विकास होणार आहे. येथील लोक मेहनती आणि प्रामाणिक आहेत. त्यांच्या हाताला काम देणे महत्त्वाचे आहे.

कणकवली येथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, वैभववाडी येथे महाराणा प्रताप यांचे दालन निर्माण केल्याने पर्यटनाबरोबरच आर्थिक उलाढाल वाढली आहे. माझ्या मतदारसंघातील दोनशेहून अधिक शाळा डिजिटल बनवल्या असून शाळांचे वीज बिल भरण्याची समस्या सोडविण्यासाठी शाळांना सोलरमार्फत वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. पुढील काळात शिक्षण आणि रोजगारावर भर देताना रोजगारासाठी आवश्‍यक असलेला मोबाईल नेटवर्कचे जाळे संपूर्ण मतदारसंघात निर्माण करणार आहे.'' 

ते म्हणाले, ""गेल्या आठ महिन्यांत राज्याच्या आरोग्य सुविधेच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. याकाळात कोरोना संकटाने बऱ्याच काही गोष्टी शिकविल्या आहेत. याचा धडा घेऊन यापुढील पंचवीस वर्षे आरोग्य सुविधेला प्राधान्य देण्याची गरज आहे. कोणताही आजार सांगून येत नाही. त्यामुळे आपण नेहमी तयारीनिशी सज्ज राहिले पाहिजे. शासन आणि प्रशासनाने नाहक कोरोनाचा बाऊ केला आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवणे सहज शक्‍य होते. त्यासाठी विविध पर्याय होते; मात्र येथील लॉकडाउन म्हणजे म्हणजे व्यापाऱ्यांचे नुकसान आणि जनतेला बेरोजगार बनविण्यासाठीचे होते. कुठलेही लॉकडाउन न करता जिल्हा कोरोनामुक्त करणे शक्‍य झाले असते; मात्र त्यासाठी योग्य नियोजनाची गरज होती. 

"नाणार', "सी-वर्ल्ड'कडे दुर्लक्ष 
मालवण-तोंडवली येथे होऊ घातलेल्या सी-वर्ल्ड प्रकल्प आणि देवगड येथील नाणार प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि रोजगाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत; मात्र या प्रकल्पाकडे आघाडी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आम्ही कोणताही प्रकल्प आणला की त्याला विरोध होतो. आपण करायचे नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचे नाही, ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून जास्तीत जास्त प्रकल्प कसे मार्गी लावता येतील, याकडे लक्ष द्यावे, असे मत राणे यांनी मांडले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane criticized the government