धक्‍का देणारा अजून जन्मला नाही ः आमदार राणे

राजेश सरकारे
Tuesday, 19 January 2021

येथील भाजप कार्यालयात राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. सोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली होते. राणे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा कुणीही मोठा नेता प्रचारात उतरला नव्हता.

कणकवली (सिंधुदुर्ग)- राज्यात शिवसेनेची सत्ता असताना ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपकडे 70 पैकी 45 ग्रामपंचायती आल्या हा खरा शिवसेनेला धक्‍का आहे. आम्हाला धक्‍का देणारा अजून जन्माला आलेला नाही, असा टोला आमदार नीतेश राणे यांनी आज विरोधकांना लगावला. सरपंच निवडीपर्यंत भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायती आणखी वाढतील असेही ते म्हणाले. 

येथील भाजप कार्यालयात राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. सोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली होते. राणे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा कुणीही मोठा नेता प्रचारात उतरला नव्हता. तर कार्यकर्त्यांनीच मेहनत घेऊन 20-25 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपकडे खेचून आणल्या. या उलट ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी खासदार आणि पालकमंत्र्यांना उतरावे लागले. या प्रचारादरम्यान त्यांनी माझ्यावर खोटी टीका देखील केली; मात्र या टीकेला जनतेनेच प्रत्युत्तर दिले. एवढेच नव्हे तर जनतेने भाजपला स्वीकारले हे देखील या निकालातून स्पष्ट झाले आहे. 

भिरंवडेत शिवसेनेचा नैतिक पराभव 
ते म्हणाले, ज्या भिरवंडेमध्ये भाजपला 36 मते मिळत होती, तेथे आम्ही 200 पेक्षा अधिक मते मिळविण्यात यशस्वी झालो हा शिवसेनेचा नैतिक पराभव आहे. सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीमध्ये भाजपला मिळालेला विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विषयक कायद्यांना समर्पित करतो. सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

भविष्यातही यश 
सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरीतही भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. पुढील निवडणुकांत रत्नागिरीचा आमदार तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदारही भाजपचाच असेल, असा विश्‍वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla nitesh rane statement gram panchayat election