खासगी डाॅक्टर्सना नीतेश राणेंनी काय आवाहन केलय वाचा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

पालिकेने केलेल्या उपाययोजना ही उत्कृष्ट असून त्यांचे कार्य अभिनंदनास पात्र आहे, अशा शब्दात नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचेही राणे यांनी अभिनंदन केले. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाशी लढा देण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज आहे; मात्र नॉन कोरोना पेशंटचा भार शासकीय आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. यासाठी खासगी डॉक्‍टर्सनी आपले दवाखाने सुरू करून सहकार्य करावे, जेणेकरून शासकीय आरोग्य यंत्रणेवर अधिक भार येणार नाही, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचे काटेकोरपणे पालन सावंतवाडीतील नागरिक करीत आहेत. पालिकेने केलेल्या उपाययोजना ही उत्कृष्ट असून त्यांचे कार्य अभिनंदनास पात्र आहे, अशा शब्दात नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचेही राणे यांनी अभिनंदन केले. 

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार राणे यांनी रविवारी सायंकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत कोरोनाशी संबंधित उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील रुग्णालयात तयार केलेल्या विलगीकरण कक्षालाही त्यांनी भेट देत प्रशासनाशी चर्चा केली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी रुग्णालयाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्‍नांची समस्या यावेळी त्यांच्याकडे मांडली.

त्यावेळी या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजनेसंदर्भात त्यांनी सूचना केल्या. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाळ्यातील पाण्याचा सदुपयोग करा अशा सूचना आमदार राणे यांनी केल्या. शासकीय विश्रामगृह व हेल्थ पार्क येथील विलगीकरण कक्षाचीही त्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर सावंतवाडी बाजारपेठेत पाहणी करत व्यापाऱ्यांशी चर्चा केली. स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावे व्यापारी व नागरिकांना केले. 

या वेळी नगराध्यक्ष संजू परब, पालिका गटनेते राजू बेग, सभापती नासीर शेख, ऍड. परिमल नाईक, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, भाजप प्रवक्ते केतन आजगावकर, शहर मंडल उपाध्यक्ष अजय गोंधावळे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पुखराज पुरोहित, मनीष दळवी, डॉ. पी. डी. वजराटकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर आदी उपस्थित होते. बाजारपेठेची पाहणी करतांना कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेने केलेल्या उपाययोजना, भाजी व इतर अन्नधान्याची केलेली व्यवस्था, घरपोच सेवा याबाबतही त्यांनी पालिका प्रशासन व नगराध्यक्ष परब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. 

केसरकरांवर टीका 
माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतः मुंबई येथे रूुान सावंतवाडीकरांकडे पाठ फिरवली. असे असताना कणकवलीचे युवा आमदार नीतेश राणे यांनी मात्र आपल्या मतदारसंघासह सावंतवाडी व कुडाळला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेसह प्रशासकीय कामाची पाहणी केली. व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सावंतवाडीवासीयांना कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सोबत राहून त्यांच्या समस्या जाणून घेत उपायोजना करण्याचे काम स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी करणे गरजेचे होते, अशी टीका या वेळी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla nitesh rane visit Sub-District Hospital sawantwadi konkan sindhudurg