रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

‘‘लोकसभा निवडणुकीचा आपण संयोजक आहोत. युतीचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या कामांना विकास निधी दिला नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खासदार राऊत यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे." 

देवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर उपस्थित होते. जठार म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीचा आपण संयोजक आहोत. युतीचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या कामांना विकास निधी दिला नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खासदार राऊत यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. शिवसेना भाजप युती झाली की नाही याबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आले नाही; मात्र युती झाली तरीही  या जागेवर भाजप दावा करणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाकडे पोचविणार असून, जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते प्रभू यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.’’

मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण कामाच्या बैठकीप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मुंबई गोवा महामार्गाशी संलग्न असणाऱ्या, कोल्हापूर व समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार गडकरी यांनी या रस्त्यांना निधी दिला असून, त्याचे श्रेय हे नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांचे आहे.

विरोधकांनी श्रेय घेताना रस्ते अडवू नयेत
भाजपा शिवसेना नेतेमंडळींच्या पाठपुराव्यामुळेच या रस्त्यांना निधी मंजुर झाला. त्यामुळे श्रेय घेणाऱ्यांनी घ्यावे; मात्र विरोधकांनी श्रेय घेताना रस्ते अडवू नयेत. कारण चौपदरीकरणाच्या कामावेळी कोणी व कशासाठी रस्त्याचे काम अडविले हे जनतेला ज्ञात आहे, असा टोला कुणाचेही नाव न घेता लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Pramod Jathar demand