रत्नागिरीतील 'या' दोन मतदारसंघावर भाजपचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 August 2019

देवरूख - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन मतदार संघावर भाजप दावा करणार आहे. यात गुहागर आणि चिपळूण - संगमेश्‍वरचा समावेश असेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्‍त केला. 

देवरूख - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन मतदार संघावर भाजप दावा करणार आहे. यात गुहागर आणि चिपळूण - संगमेश्‍वरचा समावेश असेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्‍त केला. 

शहरातील लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात आज झालेल्या तालुक्‍यातील भाजपच्या शक्‍तीप्रमुख व बूथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार लाड म्हणाले, तालुक्‍यातील भाजपचे काम चांगले असून त्याचा फायदा आगामी निवडणुकीत होईल, हे आजच्या उपस्थितीवरुन स्पष्ट होत आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत युतीचे काय करायचे ते वरिष्ठ पाहतील आपण आपल्या पक्षाचे प्रामाणिक काम करा. 

तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी सदस्य नोंदणीच्या या पर्वात तालुक्‍यातून दहा हजार नवे सभासद झाले आहेत. चिपळूण पालिका आणि देवरूख नगरपंचायत भाजपने स्वतःच्या बळावर जिंकल्या आहेत. तालुक्‍यात भाजपकडे असलेल्या ग्रामपंचायतीची संख्याही लक्षणीय आहे. तरुण मतदार भाजपकडे आकर्षित होत आहेत. अशा स्थितीत हा मतदारसंघ भाजपला मिळाल्यास आपला उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होईल यात शंका नाही असे सांगितले.

मेळाव्यात बूथ आणि शक्‍तीप्रमुखांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. त्यांच्या शंकांचे निरसन करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना मार्गदर्शन केले. बहुतांशी कार्यकर्त्यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी जोरदार मागणी केली.

मेळाव्याला जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, रश्‍मी कदम, प्रमोद अधटराव, संगीता जाधव, रुपेश कदम, सुधीर यशवंतराव, मुकुंद जोशी, मृणाल शेट्ये, अमित केतकर, डॉ. अमित ताठरे, स्वाती राजवाडे, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

निर्णय वरिष्ठांचा असेल 
जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी युतीत दोन जागा आपण मागणार आहोत. शेवटी निर्णय वरिष्ठांचा असेल. उमेदवार कोण यापेक्षा पक्ष हाच उमेदवार असे मानून आजपासून प्रत्येकाने कामाला लागा असे आवाहन केले. 

90 टक्के बूथप्रमुख उपस्थित 
देवरुखमध्ये 164 पैकी 146 आणि रत्नागिरीतही 90 टक्के बूथप्रमुख उपस्थित होते. उद्या लांजा, राजापूरमध्ये मेळावे, बैठका होणार आहेत. महाजनादेश यात्रा घेऊन मुख्यमंत्री 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान कोकणात येणार आहेत. त्याची जोरदार तयारी या मेळाव्यात सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Prasad Lad comment