'बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा समजली'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

आमचा एकही कार्यकर्ता भाजपात जाणार नाही, असे सांगण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सरसावले.

रत्नागिरी : कोरोना झालेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांसह काही कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याच पक्षातील काही लोकांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे भेटीचे फोटो व्हायरल करत जाहिरात केली, असा पलटवार करत शिवसेनेतील त्या नाराजांची भेट ही राजकीय नाही, असे भाजपचे सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खावटी कर्जासंदर्भात धोरणात्मक निर्णय ; नुकसानभरपाईच्या जाचक अटींमध्ये होणार सुधारणा -

माजी नगराध्यक्ष राहूल पंडित यांच्यासह शिवसेनेच्या काही नाराज पदाधिकाऱ्यांची माजी मंत्री चव्हाण यांनी भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली होती. आमचा एकही कार्यकर्ता भाजपात जाणार नाही, असे सांगण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सरसावले. याबाबत पत्रकारांनी प्रश्‍न उपस्थित केला असता, चव्हाण म्हणाले, राहूल पंडित यांच्यासह अनेकांची मी भेट घेतली. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता.

ज्यांना त्याचा त्रास झाला, त्यांनीच भेटीची जाहिरात करण्यास सुरवात केली. ती कोणी केली, ते सर्वश्रुत आहे. कार्यकर्त्यांना भेटल्यामुळे काहींच्या पोटात दुखू लागले. तसेच पक्षाच्या वाढीसाठी आम्हाला कोणाला भेटायचे असेल तर त्यांना आम्ही निश्‍चितच भेटणार आहोत. आणखी कोणी शिवसेनेचे नाराज असल्यास त्यांची यादी आम्हाला द्या. यामध्ये फक्‍त शिवसेनेतील नाराजांनाच भेटलो, असे नाही. कोरोना झालेल्या नगराध्यक्षांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. 

बाळ माने नाराज नाहीत

शिवसेनेतील नाराजांच्या भेटी सुरू आहेत. मात्र, भाजपमधील नाराज बाळ मानेंसह अन्य कार्यकर्त्यांना कधी भेटणार, असे विचारले असता चव्हाण म्हणाले, बाळ माने नाराज नाहीत. याबाबत शंका असेल तर तुम्ही त्यांनाच विचारा. 

हेही वाचा -  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे संबंध घनिष्ठ आहेतच ; मंत्रिपदाबाबत मात्र येणारा काळच उत्तर देईल -

शिवसेनेला जागा समजली ः लाड

बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा समजली आहे. लवकरच महाराष्ट्रातही ती दिसून येईल, असा विश्‍वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्‍त केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अजूनही जनतेचा विश्‍वास आहे. त्यामुळेच बिहारमध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजप दिलेल्या शब्दाला जागते. त्यामुळे नितिशकुमार यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA prasad lad said criticize on shivsena party on the topic of bihar election in ratnagiri