सी-वर्ल्डला नव्हे तर भूसंपादनास विरोध; वैभव नाईक यांची भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

सिंधुदुर्गनगरी - वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती, ती त्यात अपयशी ठरली. तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा दावा करत माझा या प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन करण्यास विरोध आहे, अशी भूमिका आमदार वैभव नाईक यांनी येथे मांडली. 

सिंधुदुर्गनगरी - वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती, ती त्यात अपयशी ठरली. तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा दावा करत माझा या प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन करण्यास विरोध आहे, अशी भूमिका आमदार वैभव नाईक यांनी येथे मांडली. 

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात सी-वर्ल्ड संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, 1300 एकर जमिनीमध्ये होणारा हा प्रकल्प आम्ही 350 एकरवर आणला. हा प्रकल्प व्हावा, अशी माझ्यासह तेथील जनतेची इच्छा आहे. पूर्वीच्या सरकारने या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी 100 कोटी रूपये मंजूर केले होते; पण हा प्रकल्प तीन हजार कोटींचा आहे. तो खासगीरित्या उभारला जाणार आहे. शासन उभारत नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्यास माझा विरोध आहे. जोपर्यंत प्रकल्प उभारणारी कंपनी निश्‍चित होत नाही. तोपर्यंत जमिनी संपादन करून काय उपयोग?'' 

ते म्हणाले, ""गेल्या पाच वर्षात मी कुडाळ-मालवण मतदार संघातील प्रत्येक वाडीत पोहोचलो. अशी एकही वाडी नाही, जिथे मी विकासकाम केले नाही. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघाची तुलना केल्यास सर्वाधिक निधी मी माझ्या मतदार संघात नेला. पण पाठपुरावा केल्याशिवाय अधिकारी कामे करीत नाहीत, हा अनुभव मला मिळाला. 

श्री. नाईक म्हणाले, ""मी आमदार फडासह 25/15 निधी, जिल्हा नियोजन निधी, राज्य सरकारचा थेट निधी त्यापूर्वीच्या 15 वर्षापेक्षा जास्त आहे. कुडाळ या एका तालुक्‍यात एक हजार पॉवर ट्रिलर मंजूर झाले आहेत. ही आकडेवारी महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्‍यांपेक्षा जास्त आहे. मालवण, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी या तिन्ही एसटी स्टॅण्डचे काम सुरु आहे. मालवणची नळयोजना मंजूर केली. भुयारी गटार योजनेसाठी निधी आणला. पर्यटन जेठी उभारली. वीज दाब वाढण्यासाठी सबस्टेशन सुरु केले. पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून महत्वाचे 25 ते 30 रस्ते मंजूर करून घेतले. कृषि यांत्रिकीकरणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला.'' 

ते म्हणाले, ""चांदा ते बांदा योजनेतून सर्वाधिक निधी माझ्या मतदार संघात आणण्यात मी यशस्वी झालो आहे. मी प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार-बुधवारी कामे मार्गी लावण्यासाठी मुंबईत असायचो. बाकीचे दिवस मतदार संघात फिरायचो. मुंबई-गोवा महामार्ग हे लक्षवेधी काम असून घावनाळे फाट्यावर अंडर पास ब्रिज मंजूर करून घेतले आहे. 

पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी स्वागत केले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, बाळ खडपकर, देवयानी वरसकर, विनोद दळवी, नंदकुमार आयरे, गिरीश परब, मनोज वारंग, लवु म्हाडेश्वर, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, तेजस्वी काळसेकर, रवी गावडे, गुरुप्रसाद दळवी आदी पत्रकार उपस्थित होते. 

फिशमिल जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा 
मच्छीमारांच्या प्रश्‍नावर श्री. नाईक म्हणाले, ""पारंपारिक मच्छीमार यांचा पर्सनेट विषय निकाली लावल्यावर एलईडी विषय आला. तो विषय सोडविल्यावर फिशमिल जीएसटी विषय आला आहे. तो सुद्धा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्याशी बोलून सोडविणार आहोत. 

मतदार पुन्हा मला निवडून देतील 
श्री. नाईक म्हणाले, ""पाच वर्षापूर्वी ज्या विश्वासाने या मतदार संघातील जनतेने मला निवडून दिले. तो विश्वास आपण सार्थकी लावल्याचा मला विश्वास आहे. कामावर मी पूर्ण समाधानी आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मला पुन्हा याच मतदार संघातील उमेदवारी जाहीर केली आहे. कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत मतदार पुन्हा मला निवडून देतील.'' 

वनसंज्ञा व टाळंबा प्रकल्प प्रश्‍न सोडवणार 
केवळ वनसंज्ञा व टाळंबा प्रकल्प ही दोन कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पुढील कालावधीत सोडविण्याचा विश्वास माझ्यात निर्माण झाला आहे. मतदार संघातील तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी कुडाळ एमआयडीसीमध्ये भात गिरण, गोदरेज कंपनी सुरु केली आहे. 10 कोटी खर्चाचा बांबू क्‍लस्टर मंजूर करून घेतला आहे, असेही नाईक म्हणाले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Vaibhav Naik comment on Sea World project