ओरोसमध्ये लवकरच `सिंथॅटिक स्पोर्टस्‌` मैदान ः आमदार नाईक

अजय सावंत
Monday, 25 January 2021

आमदार नाईक म्हणाले, ""शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे कार्य जोमाने सुरू आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. ओरोस येथे साडेचार कोटी रुपये खर्चून सिंथॅटिक स्पोर्टसचे मैदान साकारले जाणार आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. 
हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेच्यावतीने आयोजित 'हिंदूहदयसम्राट चषक 2021' खुल्या ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन कुडाळ तहसीलदार कार्यालय, शेजारील मैदानावर आमदार नाईक आणि ज्येष्ठ शिवसैनिक तथा उद्योजक पुष्कराज कोले यांच्याकडून झाले. 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काका कुडाळकर, सुनील भोगटे, शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, संजय भोगटे, विकास कुडाळकर, तालुका संघटक बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, रूपेश पावसकर, बबन परब, पंचायत समिती सदस्य सुबोध माधव, सौ. श्रेया परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिडारसिक उपस्थित होते. 

आमदार नाईक म्हणाले, ""शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे कार्य जोमाने सुरू आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आहे. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या प्रमाणे शिवसेनेचे कार्य सुरू आहे. कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. सुसज्ज असे क्रिडासंकूल तयार झाले आहे. या संकूलाच्या मैदानावर हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रिकेट स्पर्धा होत आहे. या संकूलाचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. ओरोस येथे साडेचार कोटी रुपये खर्च करून सिंथॅटिक स्पोर्टसचे मैदान साकारले जाणार आहे.'' उपजिल्हा प्रमुख सावंत, श्री. बंगे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. पहिला सामना टिटिएमएम ब विरूद्ध मॉर्नीग स्टार कुडाळ यांच्यात झाला. 

कुडाळच्या क्रीडांगणाचा फायदा 
श्री. कोले म्हणाले, ""क्रीडा, कला व ज्ञान याचा त्रिवेणी संगम म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्यात क्रीडा रसिक खूप आहेत. कुडाळ येथे सुसज्ज असे क्रीडांगण उभे राहत आहे. याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना होणार आहे. यातून जिल्ह्यातील खेळाडू निश्‍चितच मुंबई आणि भारताच्या क्रिकेट टिममध्ये नावलौकिक मिळवतील. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे क्रीडांगण क्रिडा रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.'' 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA vaibhav Naik says soon Synthetic sports ground Oros konkan sindhudurg