
आमदार नाईक म्हणाले, ""कोरोना कालावधीत शाळा व शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग घेतले. विद्यार्थ्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला हे कौतुकास्पद आहे.
कुडाळ (सिंधुदुर्ग) - माध्यमिकच्या सर्व शाळा दोन वर्षांत डिजिटल करू, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. नाईक यांच्या निधीतून कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा व विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सीमीटरचे वाटप केले. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आमदार नाईक बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, उपसभापती जयभारत पालव, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, राजू कविटकर, जिहा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई राजन नाईक, श्रेया परब, मंदार शिरसाट, मिलिंद नाईक, अतुल बंगे, बबन बोभाटे, एसटीचे आगार प्रमुख श्री. डोंगरे उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, ""कोरोना कालावधीत शाळा व शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग घेतले. विद्यार्थ्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला हे कौतुकास्पद आहे. कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आली आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका; पण काळजी घ्या. मास्क सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.''
नागेंद्र परब म्हणाले, ""गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासन, आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. आमदार नाईक यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारले व ते यशस्वीरीत्या निभावले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आमदार नाईक तत्पर असतात.'' अमरसेन सावंत, जयभारत पालव यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, प्रास्ताविक व स्वागत गटशिक्षणाधिकारी सुर्यभान गोडे यांनी केले.
आमदार म्हणाले, की ""सरकारने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाही शिक्षकाला कोरोना होऊ नये, यासाठी त्यांची तपासणी व्हावी. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने शाळा व विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सीमीटर वाटप करण्यात आले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करताना ज्या काही अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करू.''
संपादन - राहुल पाटील