
तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला; मात्र त्याची माहिती, प्रसिद्धी करण्यात पदाधिकारी, कार्यकर्ते कमी पडले.
मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या झालेल्या पराभवाची आमदार वैभव नाईक यांनी कबुली दिली. निवडणूक काळात ज्या काही चुका झाल्या त्या सुधारून येत्या काळात होऊ घातलेल्या पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सांघिक यश मिळवू असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
येथील शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, मंदार केणी, शीला गिरकर, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, दीपा शिंदे, किरण वाळके, उमेश मांजरेकर, सन्मेष परब, यशवंत गावकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला; मात्र त्याची माहिती, प्रसिद्धी करण्यात पदाधिकारी, कार्यकर्ते कमी पडले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे तालुकाध्यक्ष खोबरेकर यांनी सांगितले. तालुक्यातील उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच निविदा
आमदार नाईक म्हणाले, ""पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेच्या कामाची तांत्रिक मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिनाभरात या कामाची निविदा निघेल. त्याचबरोबर पालिकेच्या याच नळपाणी योजनेवरून तालुक्यातील वायरी, तारकर्ली, देवबाग या गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना राबविण्यात येणार आहे.
6 कोटींचा निधी मंजूर
आमदार म्हणाले, की जल जीवन मिशन योजनेतून या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनसाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कुंभारमाठ येथे स्वतंत्र पाण्याची टाकी उभारून त्यावरून या तिन्ही गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेवरून संबंधित गावांना विकत पाणी घ्यावे लागणार आहे. यानंतरच्या टप्प्यात कोळंब, सर्जेकोट, रेवंडी या गावांनाही पाणीपुरवठा केला जाणार आहे.''
संपादन - राहुल पाटील