वाढीव वीजबिल माफीसाठी मनसे आंदोलन छेडणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

वीजबिल माफीसाठी संपूर्ण राज्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच सिंधुदुर्गातही मोठे आंदोलन होणार आहे. त्याअनुषंगाने उद्या (ता.20) मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कणकवलीत बैठक घेऊन आंदोलनाचे नियोजन केले जाणार आहे.'' 

कणकवली ( सिंधुदुर्ग) - शंभर ते तीनशे पर्यंत वीज युनिट वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्याची ग्वाही उर्जामंत्र्यांनी दिली होती. मात्र आज तेच उर्जामंत्री वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे सांगून वीज ग्राहकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे वीजबिल माफीसाठी मनसे सिंधुदुर्गात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिली.  येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले, ""वीजबिल माफीसाठी संपूर्ण राज्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच सिंधुदुर्गातही मोठे आंदोलन होणार आहे. त्याअनुषंगाने उद्या (ता.20) मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कणकवलीत बैठक घेऊन आंदोलनाचे नियोजन केले जाणार आहे.'' 

ते म्हणाले, ""लॉकडाऊन काळात अनेक छोटे मोठे उद्योग बंद पडले. अनेकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली; मात्र लॉकडाऊन काळात वीजदरवाढ करून राज्य सरकारने वीज ग्राहकांना भरमसाठ वीजबिले काढली. त्याबाबत जनतेमधून रोष व्यक्‍त झाल्यानंतर उर्जामंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याचीही घोषणा केली होती; मात्र राज्यातील ग्राहकांना वीजबिल माफीचा प्रस्ताव फेटाळून लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांसह प्रामुख्याने छोटे उद्योजक, व्यावसायिक अडचणीत आले आहेत.'' 

श्री. उपरकर म्हणाले, ""राज्य सरकारने एस. टी. कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची तरतूद केली. त्याच धर्तीवर 100 ते 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलमाफीसाठी अडीच ते तीन हजार कोटींची तरतूद झाली असती तर हजारो वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असता. पण आघाडी सरकार ग्राहकांकडून वीज बिलाची वसुली करून घेण्याच्या मुद्दयावर ठाम आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. या आंदोलनात नागरिकांनी सहभाग घ्यावा.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Declare Agitation Against Hike in Electricity Bill