लयभारी ! पारंपारीक कलेतून कोकणच्या लाल मातीने साकारलेत आधुनिक वॉल म्युरल्स

Modern Wall Murals Made From Traditional Art With Red Clay Of Konkan
Modern Wall Murals Made From Traditional Art With Red Clay Of Konkan

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोकणची लाल माती आता महागड्या भिंतीची शोभा वाढवणार आहे. इथल्या कुंभार आणि सुतार समाजातील कारागिरांना एकत्र आणून लाल मातीची वैशिष्यपूर्ण वॉल म्युरल्स बनवून ती प्रमोट केली जाणार आहेत. फाईनआर्ट क्षेत्रातील प्रोफेशनल कारागिरांच्या मदतीने ल्युपिन फाऊंडेशन या एनजीओने हा उपक्रम हाती घेतला आहे. 

कोकणातील कुंभारांची कला बऱ्यापैकी पारंपारीक वस्तुंमध्येच अडकलेली दिसते. या क्षेत्रात कुंभार समाजातील बऱ्याच जणांकडे कौशल्य असूनही याचा आधुनिक जगाशी जोडला जाणारा विकास झाला नाही. सुतार समाजाच्या कलेबाबतही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. या दोन्ही समाजातील पारंपारीक कलेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयोग ल्युपिन या संस्थेने गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला आहे. याला आता मुर्तरूप यायला सुरूवात झाली आहे. 

मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिस, बंगले, महागड्या सदनिका यांच्या भिंती सजवण्यासाठी म्युरल्सचा वापर केला जातो. कुंभार समाजाच्या पारंपारीक कलेतील नैसर्गिकता कायम राखून अशी म्युरल्स बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासाठी फाईन आर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या काही कारागिरांना शोधून त्यांना येथे प्रशिक्षण देण्यासाठी आणण्यात आले.

तुळस परिसरातील कुंभार समाजातील कारागिरांना एकत्र आणून याचा प्रयोग सुरू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील कारागिर ज्ञानपीठ आणि माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग सुरू झाला. पहिल्याच प्रशिक्षणात 23 जणांनी यात सहभाग घेतला. यातील बहुतेकजण कुंभारकाम करणारेच होते. त्यांना ही नवी संकल्पना शिकवण्याबरोबरच त्यांच्या क्रियेटिव्हीटीला वाव देण्यात आला. 

यातून विविध प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती झाली. या सगळ्यात हस्तकलेतून साकारलेले आहेत. याच्या निर्मितीचा प्रवासही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका फ्रेममध्ये छोट्या छोट्या आकाराचे तुकडे बनवून लाल मातीपासून ही कलाकृती बनवण्यात आली. याला विशिष्टप्रमाणात उष्णता देवून ते तुकडे भट्‌टीला लावले गेले.

उष्णतेनुसार या कलाकृतीला नैसर्गिक रंगही आले. कलाकृतीतर साकारली; पण याचे वजन जास्त होते. त्यामुळे विशिष्टप्रकारची फ्रेम बनवणे आवश्‍यक होते. यासाठी पारंपारीक सुतार कलेचा उपयोग करण्यात आला. या कलाकृतींचे वजन पेलेल अशा मजबूत आणि आकर्षक फ्रेमही बनवल्या गेल्या. आता ह्या कलाकृती विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. 

याबाबत ल्युपिन फाऊंडेशनचे व्यवस्थापक योगेश प्रभू म्हणाले, ""सध्या या कलाकृती हस्तकलेतून साकारल्या आहेत. पुढे याचे साचेही बनवता येतील. पहिल्या टप्प्यात तयार कलाकृती कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दिल्या जाणार आहेत. भविष्यात याचे अधिक प्रभावी मार्केटिंग केले जाईल. यातून कोकणची एक वेगळी ओळख तयार होईल. या कलाकृतींना कोकणची अशी खास ओळख आहे. यात वापरलेल्या मातीपासून फ्रेमपर्यंत आणि कारागिरांच्या कौशल्यापासुन कल्पकतेपर्यंत सगळ्यागोष्टी अस्सल कोकणीबाज असलेल्या आहेत.'' 

असा येतो रंग 
या कलाकृतींना आलेला नैसर्गिक रंग हे याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कलाकृती तयार झाल्यानंतर त्या सुकवून भट्‌टीला लावल्या जातात. ही भट्‌टीही पारंपारीक पध्दतीची असते. यासाठी वापरलेल्या लाकडाचा दर्जा, रचलेल्या भट्‌टीची उंची, आकार आदी गोष्टीवर या म्युरल्सला येणारा नैसर्गिक रंग ठरतो. यामुळे प्रत्येक कलाकृती एकमेकांपासून वेगळी ठरते. 

""कुंभार कलेशी संबंधित शंभर पारंपारीक कारागिरांना अशा वेगळ्या कलाकृतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इतरही कलाकृती बनवले आहे. यातून हस्तकला साकारण्याबरोबरच नव्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची निर्मिती केली जाईल. या तयार वस्तुंना मार्केट उपलब्ध केले जाईल. यामुळे पारंपारीक कुंभार कलेला एका वेगळ्या उंचीवर नेणे शक्‍य होणार आहे. याचे प्रशिक्षणही अधिक व्यापक पद्धतीने दिले जाणार आहे.'' 
- योगेश प्रभू, प्रकल्प व्यवस्थापक, ल्युपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग 
 

 
संपादन - राजेंद्र घोरपडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com