esakal | मोदी सरकारने राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावे ; शेतकऱ्यांची मागणी | Sindhudurga
sakal

बोलून बातमी शोधा

 modi

मोदी सरकारने राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावे ; शेतकऱ्यांची मागणी

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी : लखीमपूर घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या `महाराष्ट्र बंद`ला सावंतवाडी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल झालेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारने राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना सादर केले.

उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने संपूर्ण `महाराष्ट्र बंद`ची हाक देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांकडून `जिल्हा बंद`ची हाक देण्यात आली होती. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासह तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल (ता.१०) शहरात फिरुन व्यापाऱ्यांना आवाहन केले होते; मात्र आज प्रत्यक्षात या बंदला सावंतवाडीकरांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरातील गांधी चौकामध्ये जोरदार निदर्शने करताना भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे मोठ्या संख्येने तीन्ही पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले; मात्र त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालय गाठून आपल्या संतप्त भावना निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार यांना सादर केले. त्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असतानाही ही राजकीय पाठबळ देऊन मोदी सरकार अद्यापही केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करत नाही हे एक प्रकारे हूकूमशाही असून अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे मोदी सरकारने राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावे अशी तमाम शेतकरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची मागणी असल्याचे म्हटले आहे.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, अशोक दळवी, शिवदत्त घोगळे, संदीप गवस प्रशांत कोठावळे सच्चिदानंद बुगडे,समिर वंजारी, अँड. राघवेंद्र नार्वेकर, देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, दर्शना बाबर-देसाई, नगरसेवक बाबु कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी आदी पदाधिकारी उपस्थित होते

loading image
go to top