Ratnagiri : सांस्कृतिक केंद्राच्या स्वच्छतेला मिळाला मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun
सांस्कृतिक केंद्राच्या स्वच्छतेला मिळाला मुहूर्त

सांस्कृतिक केंद्राच्या स्वच्छतेला मिळाला मुहूर्त

चिपळूण : शहरातील पालिकेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या स्वच्छतेची व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. पालिका आणि ठेकेदारी कामगारांमार्फत या नाट्यगृहाच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले. मात्र, महापुरानंतर तीन महिन्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केल्याने येथील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून, या मालमत्तेची महापुरात हानी झालेली असतानाही नुकसानीचा पंचनामा केला नव्हता. इमारतीची कोणत्याही स्वरूपात स्वच्छता करण्यात आली नव्हती. यामुळे सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक इनयात मुकादम यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांच्या या उपोषणाला काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बिलाल पालकर यांनीही पाठिंबा दर्शविला होता.

मुळात ठेकेदाराने सांस्कृतिक केंद्र पालिकेच्या ताब्यात न दिल्याने महापुरानंतरही हे नाट्यगृह बंद होते; मात्र आता संबंधित ठेकेदाराने पालिकेशी संपर्क साधून नुकसानीच्या पंचनाम्यासाठी व स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार या कामाला सुरवात केली आहे.

केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र या केंद्रात दहा ते बारा फुटापर्यंत पाणी शिरल्याने रंगमंचासह बैठक व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, साऊंड सिस्टिम व फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. साफसफाईच्या कामासोबतच पंचनाम्याची प्रक्रियाही पूर्ण केली जात आहे.

पालिका व ठेकेदारांची मोहीम

पालिकेचे सफाई कामगार व काही ठेकेदारी कामगारमार्फत हे काम केले जात आहे. महापूर आल्यानंतर तातडीने साफसफाईसाठी मागणी केली जात होती; मात्र ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले.

loading image
go to top