सिंधुदुर्गात १२ जूनला मॉन्सूनचे आगमन

भूषण आरोसकर
मंगळवार, 21 मे 2019

एक नजर

  • सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन
  • हवामान खात्याचा अंदाज. 
  • उष्णतेच्या झळा होणार दोन आठवड्यानंतर कमी.
  • २ ते ४ जूनच्या दरम्यान लागेल मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल. 

सावंतवाडी - सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत पाहता प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून या उष्णतेच्या झळा दोन आठवड्यानंतर कमी होणार आहेत. २ ते ४ जूनच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल लागताच उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात गतवर्षी २९ मे रोजी मॉन्सूनने पाऊल ठेवले होते. जिल्ह्यात सरासरी ७ जूनला मॉन्सूनचे आगमन होते. यंदा मात्र मॉन्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. केरळमध्ये मॉन्सूनने धडक दिल्यानंतर जिल्ह्यात १ ते २ दिवसांत मॉन्सूनची चाहूल सिंधुदुर्ग व गोवा राज्याला लागते. त्यानंतर पुढे ८ ते १० दिवसांनी तो सक्रिय होतो. यंदाचा मॉन्सून गतवर्षीपेक्षा उशिराने दाखल होणार असल्याने तेवढेच दिवस उष्णतेच्या झळा जिल्हावासीयांना सहन कराव्या लागणार आहेत.

याबाबत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे तांत्रिक अधिकारी डॉ. यशवंत मुठाळ यांच्या म्हणण्यानुसार आणखी दोन आठवडे उष्णता कायम राहणार आहे. तर पुढील आठवड्यात उष्णतेत आणखी वाढ होणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५ ते ३८ अंश सेल्सिअसएवढे कमाल तापमान राहिले आहे. ते पुढील आठवड्यात पुन्हा ३९ ते ४० अंशपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. यंदा गतवर्षी पेक्षाही प्रचंड उष्णता सोसावी लागली.

फणी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ४ ते ५ दिवस उकाड्याचा सामना करावा लागला होता. मॉन्सूनचा अंदाज घेताच मे एंडपूर्वी दोन आठवडे बेगमीच्या कामांची तयारी सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यात या कामांना वेग आला आहे. महावितरणनेही मॉन्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे. 
जिल्ह्यात ८ ते १० दिवसांनी मॉन्सून उशिराने दाखल झाल्यास त्याच खरीप हंगामावर परिणाम होणार नाही. यामुळे पाणी टंचाई भागात झळा बसणार आहेत. यासोबतच फळझाडे, पशुधन यावर जास्त परिणाम दिसून येणार आहे. खरीप हंगाम आठवडा पुढे जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon arrival on 12 June in Sindhudurg