हंगामात प्रथमच हापूसच्या लाखभर पेट्या नवी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

एक नजर

  • नवी मुंबईतील बाजार समितीत सर्वाधिक कोकण हापूसची आवक
  • महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एक लाख चार हजार पेट्या दाखल
  • या हंगामात प्रथमच सर्व मिळून लाखांवर पेटी दाखल होण्याची पहिलीच वेळ

 

रत्नागिरी - दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे आंबा काढणी योग्य होऊ लागला आहे. नवी मुंबईतील बाजार समितीत सर्वाधिक कोकण हापूसची आवक झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एक लाख चार हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. या हंगामात प्रथमच सर्व मिळून लाखांवर पेटी दाखल होण्याची पहिलीच वेळ असल्याचे नवी मुंबईतील व्यावसायिकांनी सांगितले.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूससह इतर वेगवेगळ्या भागातील आंबे विक्रीला आणले जातात. त्यात कोकणातील हापूस सर्वाधिक असतो. महाराष्ट्रासह कर्नाटकी आंबा मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत दाखल होतो. यावर्षी वातावरणातील बदलांचा परिणाम हापूससह कर्नाटकी आंब्यावरही झालेला आहे. ऑक्‍टोबरमधील वादळामुळे कर्नाटकातील उत्पादन घटले आहे. तीच परिस्थिती हापूसवर ओढवली आहे. लांबलेली थंडी आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन कमी झाले आहे. मार्चमध्ये ५० ते ६० हजार पेटी वाशीत जाते. यावर्षी ती पन्नास टक्‍केच आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही लाखभर पेटी बाजारात येते, पण यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही बागायतदारांकडून निराशाच झाली. मार्चमध्ये सरासरी १५ ते २० पेट्या कर्नाटकातून येत होत्या. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात हापूसच्या ४० ते ४५ हजार पेट्यांची, तर कर्नाटकी आंबाही २५ हजार पेटीपर्यंत होता. गेल्या चार दिवसांत वातावरण बदलल्यामुळे फळ वेगाने तयार होऊ लागले आहे. मंगळवारी (ता. १६) नवी मुंबईत महाराष्ट्रातून २५६ टेम्पो आणि १२ ट्रक मधून ६५ हजार २०० पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यात ८० टक्‍के हापूस, तर अलिबागसह अन्य प्रकारचे आंबे वीस टक्‍के आहे. कर्नाटकमधून ७१ टेम्पो आणि ३५ ट्रक मधून ३८,९०७ पेट्यांची आवक आहे. अधिक आवक झाल्यामुळे दरावर परिणाम होईल, अशी शक्‍यता आहे.

गतवर्षीच्या तुलनेत हापूसचा दर पाचशे रुपयांनी कमी आहे. त्यात कर्नाटकी आंबा दाखल झाल्याने हापूसच्या दरातील घसरण अधिक होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

कोकणच्या हापूससह कर्नाटकी आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्याचा परिणाम दरावर होणार आहे.
- संजय पानसरे,
वाशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than one lakh boxes of Hapus Mango enters in New Mumbai