esakal | Good News : मृत्यूदर कमी करण्यात 'या' जिल्ह्याने मिळवले यश
sakal

बोलून बातमी शोधा

Mortality rates are higher in six districts of the state over the past month In ratnagiri

गेल्या महिन्याभरात राज्यातील सहा जिल्ह्यात मृत्यू दर अधिक आहे.

Good News : मृत्यूदर कमी करण्यात 'या' जिल्ह्याने मिळवले यश

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : कोविड बाधित रुग्णाचा वाढता मृत्यूदर रत्नागिरी जिल्ह्यासाठी चिंताजनक होता. राज्य शासनानेही याची गंभीर दखल घेतली होती. मृत्यूदर दर कमी करण्यासाठी अ‍ॅण्टीजेन चाचण्या वाढवून लागण झालेल्यांवर तात्काळ उपचार सुरु केले. दापोली, खेड, चिपळूण तालुक्याच्या ठिकाणी अतिगंभीर रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा उभारतानाच खासगी फिजिशिअन्सची मदत घेतली. तर रत्नागिरी ऑक्सीजन देण्यासाठी हायस्लो नेसल मशिनचा अधिकाधिक वापर सुरु केला असून पंधरा दिवसात मृत्यू दर साडेतीन टक्केंवरुन 2.90 टक्केवर आणण्यात प्रशासन यशस्वी झाले.


गेल्या महिन्याभरात राज्यातील सहा जिल्ह्यात मृत्यू दर अधिक आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाकडून गंभीर उपाययोजना सुरु केल्या. आतापर्यंत 144 रुग्ण मृत पावले असून 40 ते 50 वर्ष वयोगटातील 19 रुग्ण, चाळीस वर्षांखालिल 8 रुग्ण असून उर्वरित सगळे रुग्ण पन्नास वर्षावरील आहेत. मृतांमध्ये 32 वर्षांच्या दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यांना न्युमोनिआ होता. कोरोना नमुने तपासणीसाठी रत्नागिरीत एकमेव प्रयोगशाळा असून तिथे दिवसाला अडीचशे तपासण्या होतात. त्यामुळे प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढत होती. अहवाल येईपर्यंत संबंधित रुग्णावर उपचार होत नाहीत. त्यात रुग्ण दगावतात.

हेही वाचा- मृतांची संख्या 25, एकूण बाधित 1 हजार 833! कोणता हा जिल्हा? -

तसेच दापोली, खेड, चिपळूण येथून अतिगंभीर रुग्णांना रत्नागिरीतील कोविड रुग्णालयात आणण्यात कालावधी लागल्यानेही रुग्ण मृत पावत होते. या त्रृटींचा विचार करुन कळंबणीत दुसरे कोविड रुग्णालय सुरु केले. तिथे 6 व्हेंटीलेटरही आहेत. उपचारासाठी खासगीय फिजिशिअन्सची मदत घेतली आहे. नियमित डॉक्टरही कोरोनावरील उपचारात पारंगत केले गेले. सध्या वेळेत आणि योग्य उपचार मिळू लागले आहेत. तर कामथे, दापोली येथे कोरोना हेल्थ सेंटर सुरु केल्याने प्राथमिक स्टेजला असलेल्या बाधितांनाही उपचार मिळतात.


वेळेत तपासणी सुरु करण्यासाठी जिल्ह्यात अ‍ॅण्टीजेन चाचण्या वाढविण्यात आल्या. पंधरा मिनिटात अहवाल येत असल्यामुळे रुग्णांवर त्वरीत उपचार सुरु होतात. प्रत्येक तालुक्यात किमान तीन अ‍ॅण्टीजेन चाचणी केंद्र सुरु आहेत. रत्नागिरीत सर्वाधिक मृत रुग्ण असल्याने पाच केंद्रांवर अ‍ॅण्टीजेन चाचण्या होतात. माईल्ड लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशन केले जात आहे. कोविड रुग्णालयात अतिगंभीर रुग्ण असलेल्यांना ऑक्सीजन ट्रीटमेंट देण्यात आधुनिक तंत्राचा उपयोग केला जात आहे. हायस्लो नेसल ऑक्सीजेन मशिन वापरले जात आहे. यामध्ये दहा रुग्णांपैकी 7 रुग्णांना उपयुक्त ठरत आहे.

हेही वाचा- पार्थिव दफन प्रकरणाचा चेंडू प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात, लवकरच निर्णय शक्य -

कोरोना बाधित शोधण्यासाठी अ‍ॅण्टीजेन चाचण्याचे प्रमाण वाढवितानाच अतिगंभीर रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात यश आले.

- डॉ. संघमित्रा फुले, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक

संपादन - अर्चना बनगे

loading image