दोडामार्ग तालुक्यात विजेच्या धक्याने मायलेकाचा मृत्यू

प्रभाकर धुरी
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

  • मणेरीत विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने आईमुलाचा मृत्यू. 
  • शोभा काशिनाथ नाईक (65) व गुरूदास नाईक (49) अशी मृतांची नावे. 

दोडामार्ग - मणेरीत विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने आईमुलाचा मृत्यू होण्याची घटना आज सकाळी घडली. अन्य दोघेजण सुदैवाने बचावले. शोभा काशिनाथ नाईक (65) व गुरूदास नाईक (49) अशी मृतांची नावे आहेत.  

घराजवळ एक मृत कुत्रा पडला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला ओढून शोभा नेत होत्या. त्यावेळी तुटून पडलेल्या विद्युतभारित तारेला स्पर्श त्यांना झाल्याने त्यांचा  जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या गुरुदास (वय ४९) या  मुलाचाही जागीच मृत्यू झाला. दोघे तडफडत ओरडत असल्याने गुरुदासचा धाकटा भाऊ रामदास धावत आला; पण समोरच राहणाऱ्या चुलत भाऊ अनिल कृष्णा नाईक यांनी प्रसंगावधान राखून त्यांना अडवले आणि खांबावरील वीज पुरवठा खंडीत केला.

या घटनेने गुरूदासचे भाऊ अनिल आणि रामदास यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून म्हापसा गोवा येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

महावितरणच्या बेपर्वाईमुळे दोघांचा मृत्यू झाल्याने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, विद्युत वितरण कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, गुरुदास यांच्या मुलाला विद्युत वितरणमध्ये नोकरी देण्याची हमी द्या. या सर्व गोष्टी देण्याचे मान्य करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला.

महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री लवेकर, कार्यकारी अभियंता रवींद्र देहारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन सरपंच विशांत तळवडेकर, उपसरपंच सुधीर नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother and son died due to electric shock in Dodamarag