पोटच्या मुलांसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

चंद्रशेखर जोशी
Wednesday, 28 October 2020

या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. या प्रकारामुळे संपूर्ण सोवेली गावावर शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दाभोळ : दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथील एका 26 वर्षीय विवाहितेने काल (ता. 27) रात्री आपल्या दोन लहान मुलांसह गावातील जंगलात असलेल्या विहिरीत उडी मारून आपले जीवन संपविले. या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. या प्रकारामुळे संपूर्ण सोवेली गावावर शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सोवेली चव्हाणवाडी येथील प्रथमेश लाड हे नोकरीनिमित्त विरार येथे आपल्या कुटुंबासह राहात होते. लॉकडाउननंतर ते 16 मार्चपासून पत्नी सिद्धी (वय 26), मुलगा प्रणीत (वय 3 वर्षे) व स्मित (वय 1 वर्षे 3 महिने) यांना घेऊन सोवेली येथील घरी राहावयास आले होते. काल (ता. 27) रात्री 8.15 वा. सिद्धीने जेवण तयार केले. त्या वेळी तिचे मामा सुभाष चव्हाण हेही घरी आले होते. सर्वांशी गप्पा मारून ते घरी गेले. प्रथमेश देवाच्या खोलीत नामस्मरण करत बसले होते. प्रथमेशचे वडील घराबाहेर मासे साफ करत होते. मासे साफ केल्यानंतर वडिलांनी घरात येऊन सिद्धी व लहान मुले कोठे गेली? असे प्रथमेश यांना विचारले. मात्र हे तिघेही घरात कोठेच दिसले नाहीत. त्यामुळे या तिघांचाही सर्वत्र शोध घेण्यास सुरवात केली. वाडीतील लोकांनीही शोध घेण्यास सुरवात केली. त्यांना मध्यरात्रीनंतर गावातील वाकण या जंगल परिसरातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत सिद्धी, प्रणीत व स्मित यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. ही माहिती दापोली पोलिसांना कळविण्यात आली. 

दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पालगड पोलिस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे, कॉन्स्टेबल विकास पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आज सकाळी मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हे पण वाचामहाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाला वायुसैनिक

पोलिसही गेले हादरून

पोलिसांनाही ही घटना हादरवून गेली. कॉन्स्टेबल विकास पवार ही दुर्घटना पाहून खूपच भावनावश झाले होते. ते म्हणाले, आज पहाटेपर्यंत आम्ही विहिरीजवळच होतो. दोन्ही लहान मुलांचे मृतदेह विहिरीत एकाच ठिकाणी नव्हते. आज पहाटे स्मित या लहान भावाचा मृतदेह तरंगत त्याच्या मोठ्या भावाच्या (प्रणीतच्या) मृतदेहाजवळ गेला. स्मितचा स्पर्श प्रणीतला झाला व पुन्हा होता त्याच ठिकाणी शव गेला. हे पाहून मला अश्रू अनावर झाले, असे विकास पवार यांनी सांगितले.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother suicide with two children in ratnagiri