esakal | मुंबई - गोवा महामार्गावर `या` घाटात डोंगर कटाई सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

Mountain Cutting Begins In Parashuram Ghat Ratnagiri Marathi News

परशुराम घाटातून कशेडी घाटापर्यंतच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने ठरवून दिलेल्या रस्त्याचे 60 टक्‍क्‍यांहून अधिक काम पूर्ण केले आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर `या` घाटात डोंगर कटाई सुरू 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी परशुराम घाटात डोंगर कटाई सुरू झाली आहे. पावसाळ्यात सुरू झालेल्या डोंगर कटाईमुळे येथे अपघाताचा धोका आहे; मात्र रस्ते रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे विनाअपघात डोंगर कटाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. 

परशुराम घाटातून कशेडी घाटापर्यंतच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने ठरवून दिलेल्या रस्त्याचे 60 टक्‍क्‍यांहून अधिक काम पूर्ण केले आहे. ज्या ठिकाणी डोंगर कटाई करून रस्त्याचे चौपदरीकरण करायला हवे त्या ठिकाणचे काम हाती घेतले आहे. यात प्रामुख्याने परशुराम घाटाचा समावेश आहे. फरशी तिठ्यापासून पुढे डोंगर कटाई सुरू झाली आहे. येथील डोंगर लहान आहे; मात्र येथील माती रस्त्यावर येण्याची भीती आहे.

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळून हा मार्ग बंद करण्यात आला होता. कल्याण टोलवेज कंपनीचे कर्मचारी, वाहतूक पोलिस आणि स्थानिकांनी पुढाकार घेऊन दरड हटविण्यासाठी वारंवार प्रयत्न केले होते. यावर्षी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही; मात्र डोंगर कटाईचे काम सुरू झाल्यामुळे डोंगरावरील माती रस्त्यावर येऊन महामार्ग बंद पडण्याची भीती आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार झाल्यास संबंधितांना अधिकच त्रास होणार आहे.

डोंगराची माती रस्त्यावर येऊन महामार्ग बंद होऊ नये यासाठी ठिकठिकाणी लोखंडी प्लेट लावण्यात आल्या आहेत. किरकोळ माती या प्लेटवर थांबेल; मात्र डोंगराचा काही भाग खाली आल्यास मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. परशुराम घाटात अनेक ठिकाणी काळ्या दगडाचा कातळ आहे. तो फोडण्यासाठी मोठी यंत्रे लावावी लागणार आहेत. अशावेळी डोंगराची माती खाली येण्याचा जास्त धोका आहे. 

परशुराम घाटात दरडी कोसळण्याचा गेल्यावर्षीचा अनुभव पाहता यावर्षी खबरदारीच्या उपायोजना कराव्यात. त्यानंतरच घाटातील डोंगर कटाईला सुरवात करावी, अशी सूचना आम्ही चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीला केली होती. त्यांनी ती सूचना मान्य केली आहे. दरडी कोसळल्यास त्या हटविण्यासाठी सर्व यंत्रणा तैनात केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 
- शौकत मुकादम, माजी सभापती चिपळूण. 

loading image