रत्नागिरीकिनारी 'इसिस’च्या हालचाली ; पोलिस यंत्रणा अ‍लर्ट

राजेश शेळके
Friday, 9 October 2020

जिल्हा पोलिस दलासह गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे. या संघटनेच्या हालचालीवर बारीक नजर आहे.

रत्नागिरी : 'इसिस' या जागतिक दहशतवादी संघटनेने रत्नागिरीतही तळ उभारून बस्तान बसविण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कर्नाटक येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इसिसच्या छावण्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलासह गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे. या संघटनेच्या हालचालीवर बारीक नजर आहे.

हेही वाचा -  शिवसेनेच्या आमदारांना नक्की झालय तरी काय ? 

इसिस संघटनेचे भारतीय रूप असलेल्या अल्-हिंदच्या छावण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. इसिसची दक्षिण भारतात बस्तान बसविण्याची योजना आहे. या अतिरेक्यांनी कर्नाटक राज्यातील गुंडलुपेट आणि शिवनसमुद्र जंगलात प्रशिक्षण घेण्याची तयारी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात ही माहिती दिली. कर्नाटकातील कोडगू कोलार त्याबरोबरच शेजारच्या राज्यातही हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. 

केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसात आदी ठिकाणी दहशतवाद्यांनी बस्तान बसविण्याची जय्यत तयारी केली आहे. काही अतिरेक्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान बरीच माहिती उघड झाली. अल्-हिंद अतिरेक्यांनी देश आणि राज्यातील हिंदू नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती, असे एनआयएनची माहिती आहे. ते केरळबरोबर महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार आदी ठिकाणी तळ स्थापण्याची योजना करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा - कोकणात दादर-सावंतवाडी-दादर ही कोव्हिड स्पेशल ट्रेन 

"इसिसच्या या जागतिक संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यात पाय पसरण्याची गुप्त माहिती आमच्यापर्यंत आली आहे. पोलिस दल आणि गुप्तचर यंत्रणेसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सागरी सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. बाहेरून कोण आले आहेत का? याची खात्री करण्यासाठी ठिकठिकाणी कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. सागरी रक्षक दलाला सतर्क केले असून लवकरच त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. इसिसचा एकही सदस्य आपल्याकडे नाही; मात्र पोलिस दलासह सर्व यंत्रणा त्या अनुषंगाने अलर्ट ठेवण्यात आल्या आहेत."

- विशाल गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the movement of ISIS in ratnagiri area the police and see protection alerts in sea beach