सावरकरांबाबत खासदार राणेंनी दिला शिवसेनेला सल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हा दौऱ्यावर असलेले नारायण राणे आज सावंतवाडी येथे आले असता, त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्ष लढत केसरकर विरूध्द राणे व्हावी, अशी माझी इच्छा नाही. ते माझे स्पर्धकही होऊ शकत नाहीत. तेवढी त्याची पात्रताही नाही. आमची लढत शिवसेना व कॉंग्रेस या दोन उमेदवारांशी आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा कॉंग्रेसचा उमेदवार येथे तगडा आहे; मात्र यावर मात करत बांदा, आंब्रड पाठोपाठ आता सावंतवाडीतही आम्ही हॅटट्रीक करू, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे व्यक्‍त केला. 

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हा दौऱ्यावर असलेले नारायण राणे आज सावंतवाडी येथे आले असता, त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली, अशोक सावंत, संदिप कुडतरकर, नगराध्यक्ष उमेदवार संजू परब, मनोज नाईक, अक्रम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सावरकरांबाबत वक्तव्याचा सेनेने विचार करावा 

सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून सुरू असलेल्या राजकारणावर त्यांना विचारले असता ते म्हणाले, ""राहूल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे उद्‌गार काढले, त्याची माफीही अद्याप मागितली नाही. त्यामुळे शिवसेनेने याचा विचार करावा. कारण राज्यात कॉंग्रेसशी मदत घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत आहेत.'' 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना राणे म्हणाले, राज्याच्या विकासाचा, शेतकरी कामगार अशा सगळ्याच गोष्टींचा अभ्यास नसल्याने राज्याच्या विकासाला या मुख्यमत्र्यांच्या विचारसारणीमुळे खिळ बसली जाईल. राज्यातील सरकार हे तीन पक्षाचे आहे. या सरकारमध्ये हिंदुत्ववादी व धर्मनिरपेक्ष अशी दोन विचारधारा आहेत आणि या विचारधारा दिर्घ काळ टिकणार नाहीत. कॉंग्रेसची विचारधारा धर्मनिरपेक्ष अशी आहे, असे सांगतात; पण त्यांनी येथे जातीयवादी पक्षाबरोबर सरकार केले. त्यामुळे त्याच पक्षातील लोक नाराज आहेत, हाच विरोध राष्ट्रवादीमध्येही आहे.'' 

कोट्यावधीचा निधी कुठे गेला ?

श्री. राणे म्हणाले, ""केसरकरांनी आमदार व पालकमंत्री म्हणून काय केले. येथील मोती तलावाचा भाग सोडला तर येथे भुयारी गटार योजना आहे का ? बिल्डींगमधून ड्रेनेज टाकीत सोडले जात आहे. सावंतवाडी शहराला काय केले, हे दाखवून द्यावे. ते नेहमी येथे कोट्यावधी रूपये आणले असे सांगत आहेत, तर मग निधी कुठे गेला ? अशा थापाबाज आमदाराला लोक का निवडून देतात, हे कळत नाही. आज सावंतवाडीत महिला, युवक, युवतींच्या हाताला काम आहे का ? चष्म्याच्या कारखान्याचे काय झाले ? आमचे दुदैव की, असा पालकमंत्री व आमदार या जिल्ह्यात झाले.'' 

केसरकर हे माझेच पाप 

केसरकर हे माझेच पाप आहे. त्यावेळी मी मिंटीग घेतली म्हणून ते निवडून आले; मात्र पुढे ते निष्क्रीय पालकमंत्री व आमदार झाले, हे या जिल्ह्याचे दुदैव असल्याची टीकाही श्री. राणे यांनी केली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane Advise Shivsena On Savarkar Issue