Loksabha 2019 : २८ बिल्डरबरोबर उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि मंत्री वायकर यांची पार्टनरशिप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

रत्नागिरी - मुंबईतील २८ बिल्डरबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांची पार्टनरशिप आहे. भावनिक कारणे देऊन शिवसेना निवडून येते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हा एककलमी कार्यक्रम शिवसेना करीत आहे. आंधळं दळतंय अन्‌, कुत्रं पीठ खातंय, अशी शिवसेनेची स्थिती आहे, असे आरोप स्वाभिमानचे खासदार नारायण राणे यांनी येथे केले.

रत्नागिरी - मुंबईतील २८ बिल्डरबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांची पार्टनरशिप आहे. भावनिक कारणे देऊन शिवसेना निवडून येते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हा एककलमी कार्यक्रम शिवसेना करीत आहे. आंधळं दळतंय अन्‌, कुत्रं पीठ खातंय, अशी शिवसेनेची स्थिती आहे, असे आरोप स्वाभिमानचे खासदार नारायण राणे यांनी येथे केले.

येथील प्रमोद महाजन क्रीडांगणावर झालेल्या सभेत राणे म्हणाले, ‘‘दोन दिवसांपूर्वीच्या सभेत तुमची लढत कोणाबरोबर, असे विचारल्यावर त्यांनी काँग्रेस असे सांगितले. शिवसेनेवाले खोटारडे आहेत. काँग्रेसच्या सभेला १०० माणसे होती. आम्हाला पाठिंबा बघा किती लोकं आहेत. स्वाभिमानला शिवसेनेचा, भाजपचा आतून पाठिंबा, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठबळ आहेच. या निवडणुकीत आमची लढत शिवसेनेबरोबर नाही. आमचा एकतर्फी विजय निश्‍चित आहे. ज्या इर्षेने, भावनेने नीलेशचा अर्ज भरायला आलात, तो उत्साह २३ मे पर्यंत टिकवून ठेवा. तुम्ही नीलेशचे प्रचारक आहात. घराघरांत जाऊन निशाणी फ्रीज पोचवा. थंड पाणी प्या, थंड डोक्‍याने विचार करा, परिवर्तन करायचय, विकास करायचाय यासाठी उच्च शिक्षित नीलेश राणेच योग्य आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘भाजपने मला खासदार केले. त्यानंतर मी पक्ष काढला आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. तोही मोठ्या मनाने. शिवसेना बघा, म्हणत होती युतीत राहून आम्ही सडलोय. रत्नागिरीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे, त्यांची काय अवस्था पाहा. आरोग्य यंत्रणा कमकुवत, जिल्हा परिषद दिवाळखोरीत गेलीय. विकासासाठी पैसे नाहीत. सिंधुदुर्गने मात्र राष्ट्रीय पारितोषिक मिळविले.’’

खासदार राऊत यांनी फक्‍त कंत्राटदारांकडून पैसे उकळले. मायनिंगवाले, विमानतळ विकसित करणाऱ्या कंत्राटदारांनीच त्यांच्या तक्रारी केल्या. आतापर्यंत घोषणांवर घोषणा दिल्या. त्यातील एकही पूर्ण झालेली नाही. चिपीच्या उद्‌घाटनाला गेलो, तेव्हा समजले की, ते इमारतीचे उद्‌घाटन आहे. तिथे विमान उरतलेच नाही. विकास आणि ठाकरे समीकरण नाही.’’ 

नीलेश राणेंनी भरला उमेदवारी अर्ज
स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणेंनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी नीलेश यांनी रत्नागिरीतील बारा वाड्यांचा देव भैरीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, शाम सावंत, दत्ता सामंत, राजन देसाई, रवींद्र नागरेकर, सतीश सावंत, मंगेश शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी होते. अर्ज भरल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या मेळाव्याकडे रवाना झाले. त्या मेळाव्यातून शिवसेनेला चोख उत्तर दिले. राणेंच्या आगमनावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उभे राहून हाताची मूठ छातीकडे नेत अभिवादन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane comment