सत्ताधार्‍यांना उघडा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : नारायण राणे

सत्ताधार्‍यांना उघडा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : नारायण राणे

मालवण (सिंधुदुर्ग) : तोक्ते चक्रीवादळाच्या (tauktae cyclone)तडाख्यात किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्या घरांचे, झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून घरातील चुलीही पेटलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारने या आपद्ग्रस्तांना अल्प भरपाई देत त्यांची चेष्टा न करता भरीव नुकसान भरपाई द्यावी अन्यथा या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा खासदार नारायण राणे (MP Narayan Rane) यांनी आज देवबाग येथे पत्रकार परिषदेत दिला.(MP-Narayan-Rane-tauktae-cyclone-visit-in-devbagh-kokan-news)

मालवण दौर्‍यावर आलेल्या खासदार राणे यांनी आज दुपारी देवबागला भेट देत चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, संतोष लुडबे, बाबू बिरमोळे, भाई मांजरेकर यांच्यासह स्थानिक भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राणे म्हणाले, चक्रीवादळाच्या तडाख्यात घरांचे, झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत. अनेकांच्या घरात चुली पेटलेल्या नाहीत. त्यामुळे आज देवबागवासियांच्या भेटीला आलो. देवबागची माणसे माझी माणसे आहेत. कुटुंबातील आहेत अशी 90 पासूनची भावना आहे. ती संकटात असल्याने त्यांना भेट देत विचारपूस करावी. यादृष्टीने आज पाहणी केली. यापूर्वी नीलेश राणे यांनी देवबागला भेट देत माहिती घेतली.

सरकारकडून नुकसानीची दखल घेतली जावी. स्थानिक ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्‍न आहे. आपण 1991 मध्ये जो बंधारा बांधला आज तो पूर्णतः खचला आहे. परिणामी समुद्राच्या लाटांचे पाणी घरात घुसून भिंती व घरे कोसळत आहेत. त्यामुळे आपली सरकारकडे मागणी आहे की त्यांनी त्वरित बंधार्‍याचे काम हाती घ्यावे. दोन्ही बाजूने बंधार्‍याचे काम करून ग्रामस्थांचे संरक्षण करावे. काही लोकांची घरे कोसळली आहेत. त्यांचे व्यवसाय उपजीविकेचे साधन गेले आहे. त्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी जेणेकरून ते पुन्हा उभे राहतील.

ते म्हणाले, जी नुकसान भरपाईची माहिती मिळत आहे. त्याबाबत शासन निर्णय निघाला नाही. वाटप सुरू नाही. माडाला 250 रुपये मदत दिली जाणार आहे. प्रत्यक्षात एक माड वर्षभर कुटुंबाला पोसतो. त्यामुळे शासनाने तुटपुंजी मदत देत सर्वसामान्यांची चेष्टा करू नये. किमान दोन लाख रुपये एका माडाचे मिळावेत, घराच्या दुरूस्तीला लागणारी रक्कमेचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी. दीड लाखात घर होत नाही. 50 हजारात दुरूस्ती होत नाही. सरकारने जे दर निश्‍चित केले ते योग्य नाहीत. मागील वेळी 25 कोटी जाहीर केले. मात्र 50 लाख रुपयेही दिले नाहीत. उद्धव ठाकरे येतात टाटा करून पंधरा मिनीटात निघून जातात. त्यामुळे नुकसानग्रस्तांना भरीव नुकसान भरपाई न दिल्यास सरकार विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी आहे. एवढ्या वर्षात येथील आमदार, खासदार बंधारा का बांधू शकले नाहीत. सध्या जी गावागावात मदत केली जात आहे ती पुढार्‍यांकडून होत आहे. त्यामुळे या सत्ताधार्‍यांना मी उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही असेही राणे यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग किल्ल्यासह देवबागचा वीजपुरवठा सायंकाळपर्यत पूर्ववत

तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा किल्ले सिंधुदुर्गवासियांनाही बसला. यात घरांची, मंदिरांची कौले उडून गेली. शिवराजेश्‍वर मंदिरावर वडाचे झाड पडून नुकसान झाले. त्याचबरोबर वीज खांब कोसळून वीजपुरवठाही खंडित झाला. गेले अकरा दिवस किल्लावासिय अंधारात आहेत. याबाबत राणे म्हणाले, महावितरणच्या अधिकार्‍यांशी आपण चर्चा केली असून आज सायंकाळपर्यत देवबागसह किल्ले सिंधुदुर्गवरील वीजपुरवठा पूर्ववत होईल. शिवाय जे पंचनामे करायचे आहेत तेही लवकरच पूर्ण होतील असे राणे यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींनी राजीनामा देऊ नये

मराठा आरक्षणाच्या विषयावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्‍नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजीनामा देऊन प्रश्‍न सुटणार नाही. त्यांनी जी मोहिम हाती घेतली ती भाजपमध्ये राहून घेतल्यास नक्कीच आरक्षण लवकर मिळेल. राजीनामा न देता योग्य व्यक्तींना भेटलात ज्यांच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे तर प्रश्‍न सुटू शकतो. त्यामुळे कृपया राजीनामा देऊ नये अशी छत्रपतींना विनंती असल्याचे राणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com