कोकणाच्या विकासासाठी फिश लॅडींग सेंटर्स गरजेचे : खा. सुनील तटकरे यांची अधिवेशनात मागणी

चंद्रशेखर जोशी
Sunday, 20 September 2020

अधिवेशनात आपण केंद्रीय नौवहन राज्यमंत्री  मनसुख मांडविया यांची भेट घेतल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.

दाभोळ (रत्नागिरी)  :  रायगड लोकसभा मतदारसंघाचे खा. सुनील तटकरे यांनी संसदेच्या  पावसाळी अधिवेशनात केंद्रीय नौवहन राज्यमंत्री  मनसुख मांडविया यांची भेट घेऊन रायगड लोकसभा मतदारसंघातील ९ मासेमारी बंदरे व १६ फिश लॅडींग सेंटर्स केंद्र शासनाच्या ‘सागरमाला’ योजनेतून उभारण्यात यावीत या मागणीचे निवेदन दिल्याची माहिती  खा. सुनील तटकरे यांनी दिली आहे.सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आपण केंद्रीय नौवहन राज्यमंत्री  मनसुख मांडविया यांची भेट घेतल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.

आपल्या मतदारसंघातील  ९  बंदरांपैकी ३ बंदरांचा विकास पहिल्या टप्प्यात करावा व उर्वरित बंदरांचा विकास दुसर्‍या टप्प्यात करावा. पहिल्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली तालुक्यातील हर्णे व रायगड जिल्ह्यातील जीवना (ता. श्रीवर्धन) व आगरदांडा (ता.मुरुड ) या बंदरांना विशेष प्राधान्य द्यावे अशी मागणी  खा. तटकरे यांनी केली असून  या ३ बंदरांचा विकासाचा अंदाजे खर्च ५५८.६   कोटी आहे. या बंदरांच्या ठिकाणी मरीन फूड  पार्क, सीफूड  रेस्टॉरंट व आर्ट गॅलरीही उभारण्यात यावी अशीही सूचना त्यांनी केली आहे.

हेही वाचा- मालवण स्मशानात अंत्यविधीस विरोध, अखेर पालिकेची मध्यस्थी

या बंदरांचा विकास केल्यास मासेमारी  व्यवसायाला आधुनिक स्वरूप प्राप्त होऊन सुरक्षित व स्वच्छतेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तर निर्माण होईल. आईस प्लॅन्ट, कोल्ड स्टोरेज, आधुनिक लिलावगृह आदी गोष्टींचा समावेशही या बंदरांच्या ठिकाणी असावा असे खा. सुनील तटकरे यांनी आपल्या पत्रात सुचविले असून मासेमारी व्यवसायाला नवी चालना मिळण्यासाठी  या निवेदनावर सकारात्मक  विचार करावा अशी विनंतीही खा. तटकरे यांनी नौवहन  राज्यमंत्री यांचेकडे  केली असून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासनही त्यांना मिळाले  आहे. खा. सुनील तटकरे यांचेसोबत खा. सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा- पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना थाटामाटात निरोप -
हर्णे या दापोली तालुक्यातील व रत्नागिरी जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे  असलेले बंदर हे सुरक्षित बंदर नसल्याने वादळवार्‍याच्या वेळी मच्छीमाराना आपल्या होड्या घेऊन  आंजर्ले किंवा दाभोळ खाडीचा आसरा घ्यावा लागतो. जर या ठिकाणी अद्ययावत बंदराची उभारणी केल्यास या ठिकाणचा व्यवसाय अधिक वाढेल. मात्र  अनेक वर्षांपासून या बंदराचा प्रश्‍न प्रलंबित असून अनेक वेळा या बंदराच्या कामाचे  भूमिपूजनही  करण्यात आले आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sunil Tatkare Statement of demand for Fish Landing Centres rain Convention