राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी - राऊत

प्रशांत हिंदळेकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

मालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आला. मात्र राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी ठरले. अशी धक्कादायक माहिती खासदार राऊत यांनी दिली.

याबाबतची तक्रार केंद्र शासनाकडे करत राज्याचा पर्यटन विभाग जोपर्यंत कृती योजना बनवित नाही तोपर्यत पुढील निधी न देण्याच्या सूचना केल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा दौर्‍यावर असलेल्या खासदार विनायक राऊत यांनी तळगाव येथे निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्वदेश दर्शन या योजनेची माहिती देत राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तीन वर्षांपूर्वी खासदार राऊत यांच्या पाठपुराव्याने स्वदेश दर्शन योजनेत सिंधुदुर्गचा समावेश झाला.

यावेळी पहिल्या टप्प्यात सागरी भाग विकसित होण्यासाठी 22 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडे वर्ग केला होता. मात्र त्या निधीचा विनियोग करण्याचा अहवाल बनविण्यात आला नाही. त्यामुळे उर्वरीत निधी राज्य शासनाकडे वर्ग करू नये अशा सूचना केंद्राकडे केल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील सागरी भागाचा विकास पर्यटन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.  
ते म्हणाले, स्वदेश दर्शनमध्ये पहिल्या टप्प्यात सागरी भाग घेण्यात आला. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डोंगरी भागांचा समावेश केला जाणार आहे. सागरी पर्यटन पावसाळ्यात बंद असल्याने पर्यटकांना बारमाही पर्यटनाचा आनंद लुटता यासाठी डोंगरी भागातील कातळशिल्पे, नैसर्गिक धबधबे, डोंगरी किल्ले यांच्या विकासावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

राज्यातील महाबळेश्वरच्या धर्तीवर कोकणातील हिलस्टेशन म्हणून लांजा तालुक्यातील माचाळ या गावाचा विकास केला जाणार आहे. प्रतिमहाबळेश्वर असलेल्या माचाळ येथे नयनरम्य 3460 फूट उंचीचा डोंगर आहे. तेथील आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मी स्वतः डोंगर चढून घेतला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात माचाळचा हिलस्टेशन म्हणून विकास करण्यासाठी 25 लाखाची भरीव तरतूद केली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रस्त्यासाठी 8 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे भविष्यात माचाळ येथेही पर्यटकांची ओघ वाढेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vinayak Raut comment