esakal | माणगाव खोर्‍यात जाणार विनायक राऊत; आंजिवडे घाटाची होणार पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

आंजिवडे घाटाची विनायक राऊत करणार पाहणी

आंजिवडे घाटाची विनायक राऊत करणार पाहणी

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) : गणेशोत्सवानंतर येणार्‍या नवरात्रोत्सवादरम्यान माणगाव खोर्‍यातील आंजिवडे घाटाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मी स्वतः माणगाव खोर्‍यात येणार आहे. सद्यस्थितीत सोनवडे घाट रस्ता उभारणीत किरकोळ तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी पुर्ण करून घेण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू असुन आता सोनवडे घाटासोबत आंजिवडे घाटाच्या प्रश्नाला गती देवुन आंजिवडे घाट कसा पुर्णत्वास जाईल? त्यादृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही शिवसेनेने लोकसभेतील संसदीय नेते तथा खासदार विनायक राऊत यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर खासदार राऊत आपल्या मालवण-तळगांव येथील निवासस्थानी होते. यावेळी सकाळशी बोलताना त्यांनी आंजिवडे घाट प्रश्नासंबंधी भाष्य केले.

ते म्हणाले, खर तर आंजिवडे घाट मार्गासाठी टाळंबा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष बाळ सावंत यांनी मोठे प्रयत्न सुरू केले होते. आज ते दुदैवाने आपल्यात नाहीत. त्यांची उणीव निश्चितच जाणवणार आहे. आंजिवडे घाट पुर्ण करून घेण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. सिंधुदुर्गातुन कोल्हापुर जिल्ह्यातील घाट माथ्यावर जाण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी, वैभववाडी तालुक्यातील करूळ, भुईबावडा व कणकवली तालुक्यातील फोंडा घाट असे एकुण पाच घाट आहेत; पण हे पाचही घाट कमी अधिक प्रमाणात जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे पावसाळी मौसमात गेले काही वर्ष या घाट रस्त्याच्या प्रवासात निर्धोकपणा राहीलेला नाही.

पावसाळी मौसमात वारंवार दरडी कोसळुन घाट बंद झाल्याच्या घटना घडत आहेत. परिणामी वाहनचालकांसह प्रवाशांमध्येही घाटातील प्रवास काहीसा भीतीदायक झाला आहे. या घाट मार्गाना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी घोटगे येथील सोनवडे घाट मार्गाचा प्रस्ताव ४० वर्षापुर्वी पुढे आला; मात्र तत्कालिन लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष न दिल्यामुळे सोनवडे घाट विजनवासात गेला असतानाच २०१४ मध्ये रत्नागिरी-सिंधदुर्ग लोकसभा मतदार संघातुन खासदार म्हणुन निवडुन आल्यानंतर मी सोनवडे घाट मार्गाला गती देण्याचा शब्द लोकसभेतील प्रचारादरम्यान तेथील नागरीकांना दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रशासकीय पातळीवर सोनवडे घाट मार्गाच्या प्रस्तावाचा राज्य व केंद्रस्तरावर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. आता तर जागतिक बँकेचा निधीही सोनवडे घाट मार्गासाठी मंजुर आहे. या घाटासाठी राज्य ते केंद्र स्तरावरील अनेक परवानग्यासाठी अथक पाठपुरावा करून मंजुर करून घेतल्याने घाट मार्गाचे बहुतांशी अडथळे कमी झाले आहेत. तरीपण काही तांत्रिक अडचणी बाकी आहेत.

ते पुढे म्हणाले, सोनवडे घाट मार्गाची अलाईमेंट बदलण्याबाबत अलिकडेच संबंधित यंत्रणेला सुचित केल्याने सोनवडे घाट मार्गाच्या कामाला काहीसा ब्रेक लागला. दुसरीकडे माणगांव खोर्‍यातील जनतेने संस्थानकालीन आंजिवडे घाट मार्गाचा प्रश्न उचलुन धरत तो पुर्णत्वास न्यावा अशी मागणी लावुन धरली आहे. खरे तर आंजिवडे घाट मार्ग हा जिल्ह्यातील अन्य घाट मार्गापेक्षा कमी अंतराचा, कमी खर्चाचा आहे तसेच हा घाट मार्ग झाल्यास जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने कोकण आणि घाट माथा जोडणारा महत्वाचा घाट मार्ग ठरणार आहे. याबाबत कुडाळ तालुक्यातील माणगांव खोर्‍यासह वेंगर्ले, सावंतवाडीतील मंडळींनी एकजुट करून या घाट मार्गासाठी पुढाकार घेतला आहे.

विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार वैभव नाईक व भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर या सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींनी आंजिवडे घाट मार्गासाठी सकारात्मकता दर्शविली आहे; मात्र गेली दिड वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय पातळीवरील काम रखडले गेले. आता तर कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच सर्व यंत्रणाही नव्या जोमाने कामाला लागली आहेत.

loading image
go to top