esakal | विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकाने सोडले घर
sakal

बोलून बातमी शोधा

mr dhakane teacher in kokan he helps to students in scholarship exams in ratnagiri area

असे सांगितले तर ती कथा वाटेल; पण हे वास्तव आहे. या कथेचा नायक आहे अंगद ढाकणे.

विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकाने सोडले घर

sakal_logo
By
अशोक चव्हाण

गावतळे : दापोली शहरात महागड्या खासगी शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलांना स्वत: शिकवत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत घालणारा, मोलमजुरी करणाऱ्या गरिबांची मुले शिष्यवृत्ती परीक्षेत मेरीटमध्ये यावीत, यासाठी विद्यार्थ्यांच्या घराजवळ भाड्याने खोली घेऊन राहणारा शिक्षक आहे, असे सांगितले तर ती कथा वाटेल; पण हे वास्तव आहे. या कथेचा नायक आहे अंगद ढाकणे.

हेही वाचा - कोकणात महामार्गावर पीक सुकवण्याची वेळ

ओणनवसे (दापोली) पाटीलवाडी येथील गरीब, शेतकरी, मोलमजुरी करणारे पालक यांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेत आणण्यासाठी पछाडलेले अंगद ढाकणे यांनी २०१९-२० व २०-२१ या दोन वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा मेरीटमध्ये शाळेचे नाव झळकविले. ढाकणे मूळचे मिरकळा (बीड) येथील. शिक्षण बी.एस्सी. गेली १० वर्षे ते याच शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. येथील पालकांची गरिबी, कष्टाचे जीवन त्यांनी जवळून अनुभवले. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. त्यांच्यावर शिष्यवृत्ती परीक्षेची जबाबदारी शाळेने दिल्यावर सर्वप्रथम त्यांनी दापोली शहर सोडलं.

ओणनवसे पाटीलवाडी शाळेत मुलांना घातलं. त्यांच्या पत्नीची तेवढीच तोलामोलाची साथ लाभली. गरीब मुलांसाठी वेळप्रसंगी त्यांनी आर्थिक भारही सोसला. दरदिवशी शिष्यवृत्ती परीक्षेचे तास, शनिवार, रविवारी जादा तास, कोणतीही सुट्टी न घेता शिकविले. विद्यार्थ्यांनीही त्याच्या मेहनतीचं सोनं केलं. २०१९-२० ला राज टेमकर हा विद्यार्थी २१६ गुण मिळवून तालुक्‍यात तिसरा आला. यामुळे ढाकणे गुरुजींचा उत्साह वाढला. शिक्षणक्षेत्राच्या इतिहासात त्यांचे नाव कोरले जाईल, अशी कामगिरी ते करीत राहिले. पालकांना साधी सही करता येत नाही, घरात अभ्यासाचे वातावरण नाही अशा घरातील विद्यार्थिनी श्रावणी अदावडे आज तालुक्‍यात शिष्यवृत्ती परीक्षेत २३४ गुणांसह सहावी आली आहे. इतकेच काय शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे.

हेही वाचा - ऑक्‍टोबरपर्यंत गांधीगिरी नंतर मात्र ॲक्‍शन -

जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली आहे, हेच यातून निष्पन्न होते. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, विस्तार अधिकारी कल्याणी मुळ्ये, केंद्रप्रमुख मुरकर यांनी अभिनंदन केले. ढाकणे शिक्षक समिती दापोलीच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. ही शाळा नुसती पुस्तकी ज्ञान देत नाही तर सर्वांगीण विकास करते. या यशात मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम