...तर महावितरणची तार कापू ः मनसे

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 24 January 2021

लोकांचे व्यवसाय अडचणीत आलेत तर काहींच्या नोकऱ्या गेल्या असे असताना कोणाच्याही घरातील तसेच दुकानातील वीज जोडणी कापणी केल्यास महावितरणची तार कापू, असा इशारा मनसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. 

मालवण (सिंधुदुर्ग) - लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात महावितरण कंपनीने ग्राहकांना मीटर रिडींगद्‌वारे वीज बील न पाठवता सरासरीनुसार बिल पाठवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेची वीज बीले येत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून होत आहेत. लोकांचे व्यवसाय अडचणीत आलेत तर काहींच्या नोकऱ्या गेल्या असे असताना कोणाच्याही घरातील तसेच दुकानातील वीज जोडणी कापणी केल्यास महावितरणची तार कापू, असा इशारा मनसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. 

प्रभारी प्रादेशिक संचालक यांनी कोकण विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी आणि जळगाव परिमंडळातील मुख्य अभियंता सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्ससिंगच्या माध्यमातून वीज थकबाकीदारांची जोडणी खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील नागरिकांनाही मोबाईलवर पंधरा दिवसात वीज थकबाकी भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटिसा मिळत आहेत. हा निर्णय नागरिक व्यापारी व्यावसायिक यांच्यासाठी अन्यायकारक आहे. 

महावितरणने वीज खंडित करण्याबाबत घेतलेल्या धोरणाबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष इब्रामपूरकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी तालुका सचिव विल्सन गिरकर, उपतालुका अध्यक्ष उदय गावडे, मनसे शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे शहराध्यक्ष साईराज चव्हाण आदी उपस्थित होते. 

तरीही तिप्पट बिले? 
यावेळी चर्चा करताना वीज बिल आता कोरोना पेक्षाही लोकांना भयंकर वाटू लागला आहे. लोकांकडे पैसे नाहीत आणि दुप्पट-तिप्पट बिल महावितरण आकारत आहे. त्याला काही संदर्भ आहे का? लोकांना इतके बील का आकारले जात आहे असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. वीज बिल योग्यप्रकारे द्या आणि कुठल्याही ग्राहकांची वीज जोडणी खंडित करू नका, नाहीतर महावितरणची तार मनसे कापेल, असा इशारा श्री. इब्रामपूरकर यांनी दिला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरण कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL electricity bill issue MNS statement