`मल्टीस्पेशालिटी`बाबत शिवसेनेने काय भूमिका स्पष्ट केलीय वाचा..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

यावेळी विनामोबदला जागा देत असाल तर शहरात हॉस्पिटल उभे करू, असे सांगितले; मात्र जागेची भरपाई मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शहरात व्हावे ही सुरुवातीपासूनच शिवसेनेची भूमिका आहे; मात्र त्यासाठी विनामोबदला जागेची गरज आहे. ती उपलब्ध न झाल्यास प्राप्त निधी अन्य जिल्ह्यात वळविला जाऊ शकतो. त्यामुळे विनामोबदला जागा देत असाल तर हॉस्पिटल उभे करू, अशी मागणी राजघराणे तसेच पालिका प्रशासनाकडे करण्यात आली, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे दिली. 

माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पडते बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, तालुका संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, नारायण ऊर्फ बबन राणे आदी उपस्थित होते. 

जिल्हाप्रमुख पडते म्हणाले, ""मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे ज्या जागेत भूमिपूजन झाले, ती जागा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अधिकृतरित्या ही जागा शासनाच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत याठिकाणी हॉस्पिटल उभे करणे कठीण आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार जागेसंदर्भात चर्चेसाठी राजघराण्याची भेट घेतली. यावेळी विनामोबदला जागा देत असाल तर शहरात हॉस्पिटल उभे करू, असे सांगितले; मात्र जागेची भरपाई मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

शहरात पालिकेच्या आरक्षित जागेबाबतही नगराध्यक्ष संजू परब, तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीही भेट घेत विनामोबदला जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली; मात्र शहरातील पालिकेच्या जागेसाठी 28 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तरीही नगराध्यक्ष परब यांनी सर्व नगरसेवकांशी चर्चा करून विनामोबदला जागेसाठी प्रयत्न करू. तसेच राजघराण्याची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन दिले.'' 

सावंत म्हणाले, ""महिन्याभरात हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत; मात्र आरोग्याच्या विषयांमध्ये कोणीही राजकारण न करता सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे. हॉस्पिटल कुठल्याही परिस्थितीत शहराबाहेर नेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न नाही. उगाचच हॉस्पिटलवरून राजकारण सुरू आहे.'' 

राजांचे नाव देण्याची तयारी 
राजघराण्याने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला विनामोबदला जागा उपलब्ध करून दिल्यास हॉस्पिटलला राजांचे नाव द्यायला शासन तयार आहे, असे श्री. सावंत म्हणाले. याबाबत राजघराण्याशी झालेल्या चर्चेत बोलणे झाल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: multispeciality hospital issue sawantwadi konkan sindhudurg