
28 दिवसांत पूर्ण होणार; अपघात टळणार
लांजा (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्याच्या हद्दीत सर्वात धोकादायक आणि अपघातप्रवण क्षेत्र म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या आणि आजवर या ठिकाणी झालेल्या अनेक अपघातांमध्ये शंभरहून अधिक प्रवाशांना प्राण गमवावे लागलेले वेरळ घाटी तोडण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. पुढील 28 दिवसात हे काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती चिंतामणी कन्स्ट्रक्शन मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामात हा घाट पूर्णपणे तोडणार असल्याने भविष्यातील या ठिकाणचा अपघाताचा धोका टाळणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक सुखद बाब ठरणार आहे. अवजड वाहनांबरोबरच प्रवाशांच्या दृष्टीने वेरळ येथील घाट हा डेंजरस ठिकाण म्हणून प्रवाशांमध्ये प्रसिद्ध आहे.
अशा परिस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झाल्यानंतर आता हा घाट तोडण्याचे आणि खोदाई करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. यासाठी चार पोकलेन, दोन जेसीबी, दोन ब्रेकर आणि 15 डंपर या यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने हा घाट तोडण्याचे काम शीघ्र गतीने सुरू आहे. पुढील 28 दिवसात हा घाट तोडण्याचे काम पूर्ण होईल. भविष्यात वेरळ येथील अपघाती वळण आणि घाटही नामशेष होणार आहे.
एक दृष्टिक्षेप..
लांजा तालुक्याच्या हद्दीत आंजणारी घाट, वेरळ घाट
त्यातील यू आकाराचे वळण, वाकेड घाट ही ठिकाणे धोकादायक
अपघात प्रवणक्षेत्र म्हणून आहेत प्रसिद्ध
सर्वाधिक घातक, अपघातास कारणीभूत ठरणारे ठिकाण वेरळमध्ये
वेरळ येथील यू आकाराचे वळण व वेरळ घाट हा प्रसिद्ध
आजवर या ठिकाणी झाले अनेक छोटे-मोठे अपघात
महामार्गावर प्रवास करणाऱ्या शंभरहून अधिकजणांचा या ठिकाणी मृत्यू
संपादन- अर्चना बनगे