
ओरोसः मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पहिला अपघात झाल्यानंतर तो पाहण्यासाठी ठेवलेल्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने विनायक मोहन निळेकर (वय २२ रा. रानबांबुळी) व अनुष्का अनिल माळवे (वय १८, रा. अणाव दाबाचीवाडी) यांचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला.
पहिल्या अपघातात ११ जण जखमी झाले. हा प्रकार हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरुमसमोर आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात घडला. एकूण चार वाहनांचे दोन अपघात झाले. यातील इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेला पहिला अपघात पाहण्यासाठी रस्त्यात थांबलेल्या दुसऱ्या दुचाकीला मागाहून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने दुसरा अपघात झाला. पहिल्या अपघातात एका लहानग्यासह एकूण अकरा जण जखमी झाले. यातील एकजण गंभीर आहे. या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी : पहिल्या अपघाताची तक्रार रिक्षा चालक अमोल रामचंद्र कुडाळकर (वय २९ रा. ओरोस बोरभाटवाडी) यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल केली. हा अपघात इनोव्हा कार (एमएच ०६, एबी ८२१९) आणि दुचाकी (एमएच ०७, एम ०२९४) या दोन वाहनांत झाला. इनोव्हा चालक विशाल सुनील चव्हाण (वय ३२, रा. स्वराज्य सोसायटी, कामगार क्रीडा भवनाच्या मागे, प्रभादेवी वेस्ट दादर) हे कणकवली येथून कुडाळच्या दिशेने जात होते.
यावेळी हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरुम समोरून जात असताना टाटा मोटर्स शोरुमचे सिक्युरिटी गार्ड रोहित रामचंद्र कुडाळकर हे आपली दुचाकी घेवून बाहेर पडत असताना त्याला ठोकर दिली. त्यानंतर ही इनोवा रस्त्याच्या खाली जात पलटी झाली. यामध्ये रोहित कुडाळकर यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या दोन्ही पायाला, कमरेला व डोक्याला दुखापत झाली आहे. यात सदानंद शंकर लोंढे (वय ६२, रा - कांदिवली, महावीरनगर), प्रेक्षा नाईक (वय ८, रा.कल्याण), भारती नाईक (वय ४९,रा.कल्याण), मनोज दळवी (वय ५२,रा.भाईंदर), वैष्णवी दळवी (वय ५०, रा.भाईंदर), सुनीता दळवी (वय ५८, रा. बांद्रा), कौस्तुभ गोडे (वय २६), सुष्मा गोडे (वय ५४), शैला दळवी (वय ५०, सर्व रा. भाईंदर) हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात इनोव्हा चालक विशाल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी विनायक निळेकर (वय २२) हे आपल्या ताब्यातील स्प्लेंडर (क्रमांक-एमएच ०७, ई ७८९६ ) दुचाकी घेऊन थांबले होते. त्यांच्या मागे अनुष्का अनिल माळवे होत्या. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या डंपरची (एमएच-०६, बीडी-०९९७) दुचाकीला धडक बसली. यात विनायक निळेकर आणि अनुष्का माळवे हे दोन्हीही डंपर खाली आले. दोघांचाही कंबरे खालील भाग डंपर खाली आल्याने निकामी झाला. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर चालक डंपरसह पळून गेला. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात डंपर चालक सुनील विष्णू कोळकर (वय ५२, रा- वाडीवरवडे ता. कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद हरी चंद्रकांत पालव (वय ३५, रा. हूमरमळा राणेवाडी) यांनी दिली.
नागरिक संतप्त
या अपघातात युवक आणि युवतीचा बळी गेल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात जात आक्रमक भूमिका घेत डंपर मालक आणि चालक या दोघांना आपल्या समोर आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. सुमारे १५० ते २०० ग्रामस्थ उपस्थित होते. अखेर यात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, ओरोस उपसरपंच अमोल मालवणकर यांच्यासह अन्य जणांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले. ही घटना कळताच अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी डंपर दुचाकी अपघाताचा तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.