स्थानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय, चौपदरीकरण पूर्णत्वाकडे, तरीही अस्पष्टता

Mumbai-Goa Highway work issue konkan sindhudurg
Mumbai-Goa Highway work issue konkan sindhudurg

नांदगाव (सिंधुदुर्ग) - चौपदरीकरण काम अंतिम टप्प्यात असले तरी या मार्गावर बसथांबे कोठे आणि कसे असणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. बसथांबे स्थानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे याबाबतचे चित्र स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर झाराप ते खारेपाटण या दरम्यान एकूण नवीन 28 बसथांबे आणि महामार्ग दुतर्फा 56 पिकअप शेड बांधली जाणार आहेत, अशी माहिती दिली होती; मात्र चौपदरीकरण काम अंतिम टप्प्यात असतानाही प्रवाशांची गैरसोय दिसत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच एसटी महामंडळाने ठिकठिकाणी निवारे उभे केले होते. चौपदरीकरणावेळी हटविलेले थांबे आता आहेत का?

खारेपाटण ते झाराप या दरम्यान 16 बस थांबे अधिकृत आहेत. तर स्थानिकांच्या मागणीनुसार 30 ठिकाणी विनंती थांबे होते. चौपदरीकरणात खारेपाटण ते झाराप दरम्यान 28 बस थांब्यांना मंजूरी दिली आहे. महामार्ग दुतर्फा 28 ठिकाणी हे थांबे असल्याने महामार्गाच्या उजवीकडे आणि डावीकडे मिळून 56 पिकअप शेड बांधली जाणार होती. झाराप ते खारेपाटण हद्दीतील चौपदरीकरण पूर्ण करण्याचे नियोजन ठेकेदार कंपन्यांनी चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर महामार्ग दुतर्फा नवीन 56 बस थांब्याची उभारणी होणार असल्याने सध्या ही कामे प्रगतीपथावर आहेत.

खारेपाटण, नांदगाव, ओसरगाव, कसाल, बिबवणे, कुडाळ आणि झाराप गावांत प्रत्येकी 2 तर नडगिवे, वारगाव, तळेरे, कासार्डे, वागदे, सिंधुदुर्गनगरी, हुमरमळा, वेताळबांबार्डे, पावशी, हुंबरट, तेर्सेबांबार्डे या गावात प्रत्येकी एक थांबा असणार आहे. तर कणकवली शहरात तीन बस थांबे असणार आहेत. हे सर्व बस थांबे महामार्गाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असेल.

सर्व बस थांब्याच्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत; मात्र सध्या तळगाव ते कलमठ टप्यात खारेपाटण रोमश्‍वर नगर, नडगिवे शेर्पे फाटा, वारगाव, वारगाव-उंडील मार्ग, साळीस्ते, तळेरे औदुंबरनगर, नांदगाव पावाचीवाडी, बेळणे, सावडाव फाटा या ठिकाणी बसस्टॉप उभारले असून यापुढे कलमठ ते झाराप टप्यात वागदे, ओसरगांव, कसाल, सिंधुदुर्गनगरी, हुमरमळा, वेताळबांबार्डे, तेर्सेबांबार्डे, बिबवणे, पावशी, कुडाळ आणि झारापपर्यंत सर्व बस थांबे महामार्गाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला थांब्याच्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत; मात्र अनेक ठिकाणी एका रात्रीत तयार केलेले सेवा रस्ते किती दिवस तग धरणार? 

शिवाय कलमठ ते झाराप टप्यात महामार्गाशेजारील प्रत्येक गावच्या जुन्या बसस्टॉपप्रमाणे रचना आढळते; मात्र तळगाव ते कलमठ टप्यात याबाबत पूर्वीचे काही महत्त्वाचे बसस्टॉप वगळल्याची माहिती मिळत आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थ महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुन मागणीसाठी आग्रही दिसत आहेत; मात्र मंजूरी आहे तेच बसथांबे होणार, अशी माहिती ठेकेदारांकडून व हायवे अधिकारी देत असून; मात्र याबाबत उपाययोजना काय कराव्या? असे ग्रामस्थांनी विचारले असता प्रस्ताव पाठवू, असे सांगत वेळ मारुन नेली जात आहे. यामुळे ग्रामस्थांचीही हेळसांड होत आहे. 

तळगाव- कलमठचे काय? 
ठेकेदार कंपनीने बनविलेले बस थांबे अपूरे पडत आहेत. यावरही हायवे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. यात सध्या नांदगाव तिठा, कासार्डे तिठ्यासह कणकवली व कुडाळ तालुक्‍यातील अनेक भागात आजही तात्पुरत्या बसस्टॉपची गैरसोय असल्याने नागरिकांना रस्त्यावरच उभे राहून एसटी व खासगी प्रवासी वाहनांची वाट पाहावी लागत आहेत. सध्या मिळालेल्या माहितीमध्ये कलमठ ते झाराप टप्यात बहुतांश भागातील बसस्टॉपचे प्रश्‍न मार्गी लागलेले असून मात्र त्या मानाने तळगाव ते कलमठ टप्यात बसस्टॉपचे प्रश्‍न मार्गी लागले नाहीत. 

योग्य निर्णयाची गरज 
अनेक ठिकाणी ओव्हर ब्रीज व बॉक्‍सवेल असल्याने याचा फटकाही प्रवाशांचा बसत असल्याने याबाबतही एसटी महामंडळ व हायवे प्राधिकरणाच्या बैठकीत योग्य निर्णयाची गरज आहे. सध्या वाहनांची मोठी वर्दळ महामार्गावर नसल्याने एसटी व प्रवासी वाहने मागच्या गाडीचा अंदाज घेत जुन्या बसस्टॉपवर थांबत आहेत; मात्र एकदा दोनही लेनची वाहतूक सुरु झाल्यावर नागरिकांना बसस्टॉप नसेल तर चालकाला गाडी थांबवता येणार नाही. 

काही ठिकाणी थांबे नाहीत 
कलमठ ते झाराप टप्यात वागदेपासून ते पुढे झारापपर्यंत सर्वच ठिकाणी नवे बसस्टॉप उभारले आहेत तर काहींची कामे प्रगतीपथावर आहेत तर कलमठ, जानवली दोन, हुंबरट, नांदगाव दत्तमंदिर पाटीलवाडी, केंद्रशाळा नांदगाव, ओटाव फाटा, नांदगाव तिठा, कृषी चिकित्सालय असलदे तावडेवाडी, कासार्डे सरवणकरवाडी, ब्राम्हणवाडी, जांभूळवाडी, कासार्डे तिठा, तळेरे वाघाचीवाडी फाटा, नडगिवे बांबरवाडी, खारेपाटण वरचा स्टॉप, काझीवाडी, टाकेवाडी या भागात बसस्टॉप उभारणीची मागणी आहे. 

सोयीस्कर थांबे असावेत 
चौपदरीकरणाचा नामवंत कंपन्यांना कामाचा ठेका दिला आहे. राजापूर ते तळगाव व तळगाव ते कलमठ टप्यात लोखंडी बार व पत्रे वापरुन बसस्टॉप तयार केले आहेत तर कलमठ ते झाराप टप्यात चिरेबंदी व सिमेंट कॉक्रीटचे बसस्टॉप आहेत. यामुळे नेमके या टप्या दरम्यान कशा प्रकारे बसस्टॉप उभारणी करायची आहे? याबबत संभ्रम आहे. सर्व बसस्टॉप चिरेबंदी व सिमेंट कॉक्रीटचे व्हावेत, सोबत हायमास्ट टॉवरही उभारावा आणि सोयिस्कर थांबे आणि सेवा रस्ते दर्जेदार असावेत, अशी मागणी आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com